दिलीप ठाकूर
चित्रकार एम. एफ. हुसैन व माधुरी दीक्षित दिल्लीतील रस्त्यावरून सायकलवर फिरतायत… असे फोटो सेशन तुम्ही पाहिले आहे का? हुसैन सायकल चालवताहेत व माधुरी मागच्या सीटवर बसलीय असे साधारण वीस वर्षांपूर्वी एका मॅगझिनने त्यांचे खास फोटो सेशन करुन वेगळेपण दाखवले.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण मेहबूब स्टुडिओत संगीता बिजलानी शूटिंग करीत असताना सलमान खान चक्क सायकलवरून तिला भेटायला येई हा त्या काळात गॉसिप्स मॅगझिनमधून हमखास चघळला जाणारा विषय होता.  ‘मैने प्यार किया’ प्रदर्शित होण्यापूर्वीच संगीता बिजलानी नामांकित मॉडेल होती व सलमानशी असणारी तिची दोस्ती खास चर्चेत होती. आणि मेहबूब स्टुडिओपासून सलमानचे घर अगदीच पाच मिनिटाच्या अंतरावर आहे. मग सायकलने आलेले अगदीच उत्तम.

आपल्या दोन्ही सोनाली कुलकर्णी सायकल प्रेमी आहेत. मोठी सोनाली सोशल मिडियात आपले तसे सायकल सफारीचे फोटो पोस्ट करुन सायकल व्यायाम आणि फिटनेस यासाठी कशी उपयुक्त हेही सांगते. मूळची पुण्यातील असल्याने तेथील लहान-मोठ्या गल्लीतील सायकल चालवायचा तिला बराच अनुभव असावा. आणि फिटनेससाठी सायकल अतिशय उत्तम हे तिचे म्हणणेही बरोबरच आहे. ज्युनियर सोनाली कुलकर्णी ओशिवरा परिसरात अधूनमधून सायकल चालवताना दिसते असे पटकन म्हटले तर त्यात आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यात तत्थ आहे. ती देखील सायकल प्रेमी आहे. पुणे, नाशिक, अलिबाग वगैरे ठिकाणाहून मनोरंजन क्षेत्रात आलेले अनेक कलाकारांच्या घरी वडिलोपार्जित सायकल असल्याचे व त्यानी शाळा कॉलेजमध्ये जा-ये करण्यास सायकलचा मनसोक्त वापर केल्याचे लक्षात येईल. आदिती गोवित्रीकर नवीन पनवेलमधील आपल्या काळे वाड्यातून सायकलनेच शाळेत जाई याची आठवण ती पूर्वी आवर्जून सांगे. छोट्या शहरातून आलेले कलाकार आपले आवडते वाहन म्हणून सायकलच सांगत.

आपल्या चित्रपटातील वाहन संस्कृती या वाटचालीतील सायकलला अगदी चित्रपटाचे नाव, पटकथा, गीत-संगीत तर झालेच पण अगदी फोटो सेशनमध्येही स्थान आहे. ‘सायकल’ नावाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटेचा चित्रपट येतो आहेच. कोकणातील एका सायकल प्रेमीची सायकल दोन चोर पळवतात याभोवती त्याची गोष्ट आहे. गावागावात घरोघरी सायकल ही संस्कृतीच आहे म्हणा. मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जिता वोही सिकंदर’ची पटकथाच सायकल स्पर्धेभोवती होती. आमिर खान, आयेशा झुल्का, पूजा बेदी, मामिक असे अनेक कलाकार त्यात होते. सुभाष घईच्या ‘यादे’मध्ये ह्रतिक रोशन व करिना कपूर यांच्यावर सायकलची बरीच दृश्ये होती. पण ती दाखवताना एका विशिष्ट कंपनीच्या सायकलचा ब्रॅण्डच जणू दाखवला जातोय असेच प्रकर्षाने लक्षात आले आणि जणू सायकल घसरली. पूर्वीच्या सामाजिक कौटुंबिक चित्रपटात सायकल दृश्य दिसे. सायकलवरची गाणी हा आणखीन एक भन्नाट प्रकार. त्यात अतिशय श्रवणीय व देखणे म्हणजे विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे मेरे सपने’मधील ‘एक मैने कसम ली…’ सायकलस्वार देव आनंदला मुमताजच्या ‘डबल सीट’चा छान सहवास. कधी ती मागे बसलीय. तर कधी पुढे. देव आनंद म्हणजे जबरा रोमान्स हे समीकरण येथेही दिसते. ‘पडोसन’मध्ये सायरा बानू व तिच्या मैत्रिणी सायकलवरच ‘मै चली मै चली…’ गातात. ग्रामीण भागात पोस्टमन सायकलवरून पत्रांचे वाटप करी. ‘पलको की छाँव मे’ मधील राजेश खन्ना ‘डाकियाँ डाक लाया…’ हे सायकलवरुनच गातो. पूर्वीच्या अनेक चित्रपटातून सायकल दिसे. कधी गाण्यात तर कधी विनोदात. विशेषतः पोपटलाल उर्फ राजेंद्रनाथने सायकल सवारीत बरेच घाईघाईत विनोद केलेत.

या सगळ्यात मेहमूदच्या ‘कुंवारा बाप’ची सायकल रिक्षा अगदी वेगळीच. त्याच्याच रिक्षात एक दाम्पत्य (विनोद मेहरा व भारती) तान्हुल्याला सोडून जाते म्हणून त्याचे पालकत्व मेहमूद स्वीकारतो. पण ते मुल मोठे होतानाच लक्षात येते, त्याला पोलियो आहे.

‘मै हू घोडा यह है गाडी…’ हे यातील सायकल रिक्षाचालक मेहमूदचे गाणे खूप भावपूर्ण आहे. चित्रपटातील सायकल स्वारीचे रंगही कसे विविधस्पर्शी आहेत ना?