२०१६ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी फार महत्त्वाचे वर्ष ठरले. विविध धाटणीच्या मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. पण, त्यातही एका चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. तो चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’. या चित्रपटाच्या कथानकाने आणि त्यातील कलाकारांनीही प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली होती. अशा या चित्रपटाच्या चाहत्यांच्या यादीत आता आणखी एका दिग्गज चाहत्याच्या नावाची भर पडली आहे. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या मनावरही ‘आर्ची-पर्शा’च्या ‘सैराट’ प्रेमाने भुरळ घातली आहे.

नवोदित कलाकारांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणाऱ्यांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचे नाव नेहमी पुढे असते. गेली अनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दर्जेदार अभिनय सादर करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी नुकताच ‘सैराट’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे चित्रपटाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सैराट’ चित्रपटाचा एक फोटो पोस्ट करत बिग बींनी ‘मी सैराट हा मराठी चित्रपट पाहिला. अद्भुत…अगदी सोप्या पद्धतीने या चित्रपटातून किती साऱ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत’, असे कॅप्शनही लिहिले आहे. त्यामुळे ‘सैराट’ची जादू आजही कायम आहे असेच म्हणावे लागेल. बिग बींनी ‘सैराट’चे कौतुक करण्यासोबतच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

दरम्यान, नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीतील आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही याडं लावलं. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले होते. रिंकूला तर चित्रपटातील तिच्या अभिनयाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘सैराट’ सिनेमातून अल्पावधीतच घराघरांत पोहोचलेल्या आणि तरुणाईला वेड लावणाऱ्या आर्ची आणि परशाला अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नेमले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करा, असे आवाहन ते मतदारांना करणार आहेत. त्यांची छायाचित्रे पोस्टरवर झळकत आहेत.