अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांचे दोन दिवसांपूर्वीच प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर बच्चन आणि राय या दोन्ही कुटुंबांमध्ये सध्या शोकाकूल वातावरण आहे. ऐश्वर्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाद्वारे कृष्णराज राय यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मृत्यू’ शब्दांत व्यक्त करताच येऊ शकत नाही, असे म्हणत त्यांनी एफबी आणि ट्विटरवर पोस्ट केली आहे.

कृष्णराज यांच्याबद्दल लिहित एका ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी त्यांचे मन मोकळे केले. या ब्लॉगद्वारे अमिताभ यांनी त्यांच्या शब्दात मृत्यूबाबतची भावना व्यक्त करत आयुष्यातील या टप्प्याला प्रवासाची उपमा दिली. ‘आयुष्यातील शेवटच्या सत्याचे आणि या टप्प्याचे वेगळेच दु:ख आहे. त्यातील रितीरिवाज, परंपरा आणि त्यावेळी सांत्वन करण्यासाठी येणारे लोक, अंत्यसंस्कार…. या साऱ्याविषयी काय म्हणावे.. काय करावे. या सगळ्यामध्ये ज्याचा मृत्यू होतो तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी असते. कारण, त्या व्यक्तीला स्वर्गीय शांतीची अनुभूती होणार असते’, असेही अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

बिग बी सध्या विविध जाहिराती आणि काही चित्रपटांच्या निमित्ताने व्यग्र असले, तरीही या प्रसंगी ते ऐश्वर्याच्या कुटुंबासोबत आहेत. सर्वांचा आवडता अभिनेता म्हणून अमिताभ यांनी त्यांची जबाबदारी पाड पाडली आहेच. पण, या ब्लॉगद्वारे घरातील एक जबाबदार आणि मोठी व्यक्ती म्हणूनही त्यांनी आपली भूमिका पार पाडली आहे असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, ऐश्वर्या राय-बच्चनच्या वडिलांवर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. कृष्णराज राय यांचा कर्करोगाने शनिवारी मृत्यू झाला. त्यांना दोन आठवड्यापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण प्रकृती खालावल्याने पुन्हा एकदा आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आजाराशी झुंज देत असतानाच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कृष्णराज राय यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे.