गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय नेतेमंडळी आणि दाऊद हे दोन विषय चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी धमकीचे फोन आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच गेल्या दोन-चार दिवसात दाऊद आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काही चर्चा सोशल मीडियावर रंगल्याची दिसून आली.

नक्की काय घडला प्रकार?

सोशल मीडिया हे अतिशय गतिमान असे माध्यम आहे. सोशल मीडियावर आलेला फोटो किंवा माहिती पटकन व्हायरल होते. अनेक लोक त्या फोटो किंवा माहितीची शहानिशा न करताच ते फोटो फॉरवर्ड करतात. नुकताच एका ट्विटर युझरने अमित बच्चन यांचा एक फोटो पोस्ट केला. त्या फोटोत त्यांच्यासोबत काळा गॉगल लावलेला माणूस हा दाऊद असल्याचा दावा त्या युझरने केला. पण मूळात तो फोटो दाऊदचा नव्हताच.

हा पाहा तो व्हायरल फोटो-

या फोटोतील गॉगल लावलेला माणूस कोणी डॉन वगैरे नसून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे होते. अमिताभ बच्चन आणि अशोक चव्हाण यांचा एक जुना फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोबाबत काही नेटकऱ्यांनी चुकीचा प्रचार केला. पण अमिताभा यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने लगेच त्यावर स्पष्टीकरण दिलं. “हा फोटो माझे वडिल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आहे”, असा त्याने ट्विटवर रिप्लाय दिला.

दरम्यान, आपली चूक उमगल्यानंतर त्या ट्विटर युझरने ट्विट केलेला फोटो डिलीट करून टाकला.