अभिनयाव्यतिरिक्त जर अमिताभ बच्चन यांना आणखी कोणत्या गोष्टीवर प्रेम असेल तर ते म्हणजे ट्विटर. ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधणं, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणं बिग बींना किती आवडतं, हे काही वेगळं सांगायला नको. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटरवर नाराजी व्यक्त करत अकाऊंट बंद करण्याचा इशारा देऊन नेटकऱ्यांना धक्का दिला होता. त्यानंतर ट्विटरच्या टीमने बिग बींची भेट घेऊन त्यांना ट्विटर कशा पद्धतीने काम करते हे समजावून सांगितले. इतके सगळे होऊनही पुन्हा एका दिवसात २ लाख फॉलोअर्स अचानक कमी झाल्याने हतबल झालेल्या अमिताभ बच्चन यांनी ट्विटरसाठी आता एक कविताच लिहिली आहे.

‘मला काही छापायची इच्छा आहे आणि तुम्ही मला छापू देत नाही आहात. एकाच दिवसात तुम्ही २ लाख फॉलोअर्स कमी केले, आता किमान हे तरी मला सांगू द्या. इतका त्रास देऊ नका,’ असे ट्विट त्यांनी केले. त्यानंतर ट्विटरसाठी एक कविताही त्यांनी पुढे लिहिली,

वाचा : झी गौरव २०१८ पुरस्कारांची नामांकने जाहीर 

‘मी ट्विटरच्या दुनियेतून काढता पाय घेत आहे, कारण माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी झाल्याचं समजतंय. ट्विटरच्या या समुद्रविश्वात इतरही काही मासे म्हणजेच ट्विटर युजर्स आहेत, जे अनेकांनाच आवडतात,’ असं ट्विट अमिताभ यांनी ३१ जानेवारी रोजी केलं होतं. ट्विटर सोडण्याचा जणू त्यांनी इशाराच दिला होता. त्यांच्या या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आणि ट्विटर कशा पद्धतीने काम करतं, हे समजावून सांगण्यासाठी चक्क ट्विटरची टीम बिंग बींच्या भेटीला पोहोचली होती.