बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या बहुप्रतिक्षित द सब्स्टान्स अॅण्ड द शॅडो या आत्मचरित्राचे सोमवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी अवघे बॉलीवूड उपस्थित राहिले होते. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, आमिर खान, सायरा बानू, लेखक उदया तारा नायर यांनी दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले.

सांताक्रुझ येथील ग्रँण्ड हयात येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात बॉलीवूडमधील जुन्या कलाकारांपासून ते आताची नवी कलाकारांची पिढीही उपस्थित होती. झिनत अमानपासून ते डॅनी डेनझोन्गपा, फरीदा जलाल, वैजयंतीमाला, सुभाष घई, अयान मुखर्जी, संजय लीला भन्साली, राजकुमार हिराणी, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा हे उपस्थित होत्या. यावेळी दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू हिरव्या रंगाच्या साडीत दिसल्या.

पुस्तकाच्या प्रकाशनापू्र्वी सायरा म्हणाल्या की, ज्या समर्पणाने आम्ही हे पुस्तक लिहले आहे, तसाच त्यास वाचकांचाही प्रतिसाद मिळावा अशी देवाकडे प्रार्थना करा. या पुस्तकात तुम्हाला नक्कीच दिलीप कुमारांबाबत माहित नसलेल्या गोष्टी वाचायला मिळतील. ९१वर्षीय दिलीप कुमारांच्या या आत्मचरित्रात त्यांच्या जन्मापासून ते आतापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आयुष्यात, कुटुंबात, चित्रपट कारकिर्दीत पाहिलेले चढउतार याबद्दलची माहितीही यात देण्यात आली आहे.

यावेळी आमिरने प्रसून जोशीने लिहलेली कविता म्हटली. तो म्हणाला की, आपण सगळेच या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होतो. मी युसुफ साहाब यांचा खूप मोठा चाहता आहे आणि मी पुस्तक आणि अनुभव वाचण्याची प्रतिक्षाच करत होतो.

दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली. त्यांना १९९१साली पद्मभूषण आणि १९९४साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.