बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर जान कुमार सानूच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीदेखील बिग बॉस व्यवस्थापनानं आणि जान कुमार सानूनं महाराष्ट्र आणि मराठी जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली आहे.

“बिग बॉसच्या व्यवस्थापनाने व या व्यक्तीनं महाराष्ट्राची व मराठी जनतेची त्वरित माफी मागावी. ज्यानी हे कृत्य केले त्याची तातडीने हकालपट्टी करावी. अशी बदनामी करणाऱ्यांची चित्रीकरण परवानगी महाराष्ट्र शासनाने रद्द करावी,” अशी मागणी आदेश बांदेकर यांनी केली आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय?

जान कुमार सानूला बिग बॉसमधून वगळा

सध्या जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. दरम्यान, यानंतर शिवसेना नेते सरनाईक यांनी जान सानूला बिग बॉसमधून वगळण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा- मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं तेच पाहतो; अमेय खोपकरांचा बिग बॉसच्या स्पर्धकाला इशारा

“बिग बॉस या मालिकेचे शूटिंग महाराष्ट्रात होते. मराठी लोकांमुळे TRP वाढतो त्याच महाराष्ट्राच्या मराठीचा अवमान मालिकेतल्या जान कुमार सानूने केला हे कदापि खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात करियर घडवलेल्या गायक कुमार सानूचा मुलगा मराठीचा द्वेष व अनादर करत असेल तर हे सहन केले जाणार नाही,” असं सरनाईक म्हणाले. जान कुमार सानूनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरडोओरडा करत मराठी भाषेचा अवमान केला आहे. त्याबाबत जर कलर्स वाहिनीनं मुजोर जान सानूची हकालपट्टी केली नाही तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी वाहिनीला दिला आहे. याव्यतिरिक्त मराठी भाषेबद्दल प्रेम असलेल्या सलमान खाननंदेखील अशा स्पर्धकांना त्याच्या भाषेत समज द्यावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.