वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com
छोटा पडदा
‘बिग बॉस’च्या घरात रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांच्यामध्ये जे झालं त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. समाजमाध्यमांमध्ये चर्चा झाल्या. लोकांच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हा विषय चघळला गेला. ‘त्यांच्यात जे सुरू होतं, ते जरा अतीच होतं’ आणि मग ‘ते नियंत्रित करण्यासाठी हर्षिता खानविलकरला आणलं गेलं आणि तिच्या मार्फत त्यांना चार गोष्टी सुनवल्या गेल्या’, तेही कमी पडलं म्हणून की काय ‘महेश मांजरेकर यांनीही तुमचं चुकतंय असं त्या दोघांना खडसावून सांगितलं आणि तरीही ते दोघंही आपल्या वागण्याचं समर्थन करत राहिले’ असा बऱ्याच जणांचा समज झाला आहे असं समाजमाध्यमांमधल्या तसंच इतरत्र कानावर पडणाऱ्या चर्चेतून जाणवलं आणि मग प्रेक्षकांच्या भाबडेपणाचं, तथाकथित संस्कृती रक्षक भूमिकेचं हसूच यायला लागलं.

‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो असला, १०० दिवस ते स्पर्धक त्या घरात बंद होऊन राहणार असले तरी टीव्ही या माध्यमाच्या यच्चयावत प्रेक्षकांनी कधीतरी हे लक्षात घ्यायला हवं की टीव्ही हा दुसरं तिसरं काहीही नाही तर नाटय़ आहे. ते नसेल तर कुणीही त्याकडे ढुंकून बघणार नाही. रोजच्या जगण्यातला तोच तोपणा आपण टाळू शकत नाही, म्हणून कुठेतरी घडणारं नाटय़ प्रेक्षकांना हवं असतं. त्यामुळेच मग आवडत नाही असं म्हणत सासू-सुनेच्या नाटय़मय मालिका चवीने बघितल्या जातात. इतरही अनेक कार्यक्रमांना नावं ठेवत, त्यांच्यातल्या उणिवांवर सतत बोट ठेवतही ते बघितले जातात.

‘बिग बॉस’मध्ये देखील प्रेक्षकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवणारं नाटय़ असणं अपेक्षित आहे. त्या घरात ही माणसं रोज काहीही न करता फक्त शिळोप्याच्या गप्पा मारत, स्वयंपाक करत, बिग बॉसने दिलेलं टास्क पूर्ण करत बसलेली दिसली तर कोण रोज रोज बघेल हा आणि चर्चा करेल? प्रेक्षकांना त्यात कशाला रस वाटेल? प्रेक्षकांना या कार्यक्रमाकडे खेचून आणणं, आपण जे काही करू त्याची चर्चा घडवून आणणं ही त्यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचीही अलिखित जबाबदारी आहे. त्यासाठीच तर त्यांना पैसे मिळणार आहेत. दर आठवडय़ाला प्रत्येक स्पर्धकाच्या बाजारमूल्या-नुसार एक ते २५ लाख रुपये मिळणार आहेत असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. असं असताना चर्चा घडवून आणायची असेल तर कुणीही काय विचार करेल? आपल्या समाजात चर्चा कशामुळे घडू शकते तर तथाकथित प्रेम प्रकरणामुळे, हिरो-हिरोईन कॅमेऱ्यासमोर करतात ते प्रेम जसं खरं नसतं पण प्रेक्षक ते खरं आहे असं मानून चालतो तसाच हा सगळा प्रकार आहे. ‘बिग बॉस’कडे प्रेक्षक खेचून आणण्याचं काम या तथाकथित प्रकरणाने केलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. या तथाकथित प्रकरणाची ज्या प्रकारे चर्चा झाली, त्यातून ‘बिग बॉस’च्या लोकप्रियतेची खुंटी हलवून बळकट करून घेतली गेली असणार. त्याचा चॅनलला फायदा झाला असणारच. कलाकारांना तर दर आठवडय़ाला पैसे मिळणारच आहेत, प्रेक्षकांनी मात्र आपला वेळ खर्च करून संस्कृती बुडत असल्याचा मनस्ताप करून घेतला आहे.

आपण हे नीट समजून घ्यायला हवं की हा सगळा खेळ आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असा. एखादा भुताटकीचा सिनेमा बघताना आपण घाबरत नाही,  कारण हे सगळं खोटं आहे, हे सगळ्यांना माहीत असतं. फक्त त्यातली भीती निर्माण करायचा प्रयत्न कसा केला आहे, यावरून त्या दिग्दर्शकाच्या बौद्धिक क्षमतेचे आपण आडाखे बांधतो. हेच विनोदी तसंच फॅण्टसीपूर्ण कलाकृतींच्या बाबतीत असतं. हेच, असंच ‘बिग बॉस’च्या बाबतीत आहे. हा प्रेक्षकांनी गुंतून राहावं यासाठी रचलेला खेळ आहे. प्रेक्षक नेमक्या कोणत्या वळणावर अडकणार आहे, याचा पुरेपूर अभ्यास करून आखलेला खेळ. तरुणांचं प्रेमप्रकरण घडलं तर त्याकडे कौतुकाने बघितलं जाईल. प्रौढांचं तथाकथित प्रेम प्रकरण चर्चिलं जाईल हा त्यातला नेमका आडाखा. आणि त्याचा नेमही बरोबर लागला आहे. आणि प्रेक्षकांची गंमत अशी की टीव्हीवर सतत सुरू असलेल्या सिनेमांमधून- गाण्यांमधून जे लहान मुलांपर्यंत पोहोचायला नको, ते पोहोचतं. त्यावर कुणी आक्षेप घेताना दिसत नाही. उलट उत्तान गाण्यांवर लहान मुलं तसेच हावभाव दाखवत नाचतात, त्याचं कोडकौतुक केलं जातं. ते कुणाला वावगं वाटत नाही. मग ‘बिग बॉस’सारख्या निव्वळ मनोरंजनासाठी रचल्या गेलेल्या खेळाकडून तथाकथित नैतिक वर्तणुकीची अपेक्षा का करता?
सैजन्य – लोकप्रभा