टीव्ही विश्वातील सर्वात जास्त विवादस्पद शो म्हणजे ‘बिग बॉस’. छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी पर्व दुसरे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता शोमध्ये कोणते कालाकार सहभागी होणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो कलाकारांच्या वागण्यामुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या सेटमुळे देखील प्रसिद्ध आहे. त्यातच बिग बॉसच्या या पर्वाचे शूटिंग लोणावळ्यामध्ये होणार नाही हे ऐकून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हिंदी बिग बॉस प्रमाणेच मराठी बिग बॉसचा सेट देखील लोणावळ्यात उभा करण्यात आला होता. परंतु टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ‘बिग बॉस मराठी २’चा सेट मुंबई येथील गोरेगाव फिल्म सीटीमध्ये उभारण्यात आला आहे. याआधी मल्याळम बिग बॉसचे शुटिंग गोरेगाव फिल्म सीटीमध्ये करण्यात आले होते. कलाकार आणि शो सेटच्या दृष्टिने मुंबई येथील गोरेगाव सोयीस्कर असल्याने शो निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची ट्विटरव्दारे नुकताच घोषणा झाली आहे. तसेच शोमध्ये ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतील शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर हे कलाकार दिसणार असल्याची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.