News Flash

महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी ‘कलर्स’चा माफीनामा; मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

मराठीची चीड येत असल्याचं जान कुमार सानूनं केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर अन्य पक्षाच्या नेत्यांनी जान कुमार सानू आणि कलर्स वाहिनीला इशारा दिला. परंतु वाढता विरोध पाहता कलर्स वाहिनीकडून एक माफीनामा सादर करण्यात आला आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : जान कुमार सानूशी संबंधित मराठी भाषेवरुनचा वाद नक्की आहे तरी काय?

कलर्स वाहिनीनं झालेल्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राची माफी मागितली आहे. “कलर्स वाहिनीवर २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या भागासंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. आम्ही याची दखल घेतली असून ज्या ठिकाणी ते वक्तव्य आहे तो भाग आम्ही सर्व ठिकाणांहून काढून टाकत आहोत. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखावली गेली याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि आमच्यासाठी सर्व भाषा एकसमान आहेत,” असं कलर्स वाहिनीनं पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.


काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू सध्या ‘बिग बॉस’मधील आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. “मराठी भाषेत माझाशी बोलू नका, मराठी ऐकून माझ्या डोक्यात तिडीक जाते.” असं खळबळजनक वक्तव्य त्याने केलं. या वक्तव्यामुळे सध्या त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. महाराष्ट्रात राहून देखील त्याला मराठी भाषेचा इतका राग का येतो? असा संतप्त सवाल केला जात आहे. शिवाय काही नेटकरी तर त्याला बिग बॉसमधून बाहेर काढावं अशीही मागणी करत आहेत.

आणखी वाचा- मराठी भाषेची चीड येते म्हणणारा जान कुमार आहे तरी कोण?

मराठी प्रेक्षकांसोबतच मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला आहे. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला. मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 3:56 pm

Web Title: big boss season 14 jaan kumar sanu controversial statement on marathi language colors channel apologize sends letter cm uddhav thackeray jud 87
Next Stories
1 पुन्हा एकदा हॉलिवूडपटात झळकणार ‘देसी गर्ल’; जाणून घ्या, तिच्या प्रोजेक्टविषयी
2 प्रसिद्ध अभिनेत्री अपराजिता यांना करोनाची लागण
3 काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो