कपडय़ांना एकदा डिझायनर लेबल लागले की त्यांच्या किमती आकाशाला पोहचल्याच समजा.. त्यामुळेच चकचकीत दुकानांमध्ये मांडलेल्या सुंदर कपडय़ांकडे पाहून ‘दुरून डोंगर साजरे’ ही प्रतिक्रिया ठरलेली असते. पण या संकल्पनेला छेद देत अनेक मोठे डिझायनर्स आता आपला ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी धडपड करू लागले आहेत. त्यासाठी त्यांनी नेहमीच्या लाखोंच्या घरात जाणाऱ्या ‘कलेक्शन्स’ना फाटा देत मध्यमवर्गीयांना परवडेल असे कपडे तयार करण्यास सुरुवात केली आहे.
काही काळापूर्वीपर्यंत मनीष मल्होत्रा, विक्रम फडणीस, नीता लुल्ला, अनिता डोंगरे ही नावे केवळ सेलेब्रिटीजसाठी आणि श्रीमंतांपर्यंतच मर्यादित आहेत असे मानले जाते. लाखो रुपये किंमत असलेले हे कपडे विकत घेण्याचा विचारही मध्यमवर्गीयांच्या मनाला शिवत नाही. हीच बाब लक्षात घेऊन डिझायनर आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या मध्यम आणि उच्च मध्यमवर्गातील ग्राहकांकडे लक्ष देत आहेत. यासाठी नवीन ब्रॅण्ड्स किंवा रिटेल ब्रॅण्डशी हात मिळवणी करत आहे. याची सुरुवात डिझायनर ‘रितू कुमार’ने केली होती. ‘रितू कुमार लेबल’ या नावाखाली त्यांनी रिटेल क्षेत्रामध्ये प्रवेश केला. त्यानंतर डिझायनर अनिता डोंगरे यांनी स्पर्धेत उतरत ‘अँड’, ‘ग्लोबल देसी’ हे दोन ब्रॅण्ड्स सुरू केले. या दोघींनी गेल्या दोन वर्षांमध्ये १०० कोटींच्या क्लबमध्ये आपले नाव नोंदवले आहे. अनिता डोंगरे आपल्या व्यवसायिक यशामध्ये रिटेल क्षेत्राचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगतात.
रोहित बाल हे ‘बिबा’ या रिटेल ब्रॅण्डशी संलग्न आहेत. तर विक्रम फडणीसने ‘नक्काशी’ या ब्रॅण्डसह भागीदारी करत खास कलेक्शन सादर केले. ‘कित्येक वर्षे मी केवळ सेलेब्रिटीज आणि उच्च वर्गातील लोकांसाठीच कलेक्शन्स तयार करत होतो. पण सध्या भारतात नव्याने तयार होणारा उच्च मध्यमवर्ग हासुद्धा डिझायनर कलेक्शन्सकडे तितक्याच जागरूकतेने पाहू लागला आहे. ते खरेदी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आजच्या काळात या ग्राहकवर्गाला दुर्लक्ष करणे चालण्यासारखे नाही,’ असे फडणीस यांनी सांगितले.
अर्थात हे खरे असले तरी, डिझायनर कलेक्शन्स महागडी होण्यामागचे प्रमुख कारण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्चप्रतीच्या कापडाची, एम्ब्रॉयडरीची किंमत. त्याविषयी बोलताना तो सांगतो, ‘जेव्हा एखादा डिझायनर रिटेल व्यवसायात उतरतो, त्या वेळी तयार होणाऱ्या कपडय़ांची संख्या वाढते आणि निर्मिती खर्च विभागला जातो. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य असते.’ ‘प्रेट लेबल’, ‘डिफ्युजन लाइन’ या नावाखाली डिझायनर्स आपली मूळ कलेक्शन्स आणि ग्राहकवर्ग सांभाळत या वर्गासाठी खास कलेक्शन्स काढत आहेत. या वेळी मुख्यत्वे नवरा-नवरीचे कपडे आणि सणासुदीच्या कपडय़ांकडे लक्ष केंद्रित केले आहे. या कपडय़ांची सुरुवात साधारणपणे पाच हजार रुपयांपासून होताना दिसते.
ऑनलाइन वेबसाइट्सचा वाढता ग्राहकवर्ग आणि सोशल मीडियाचा परिणाम
अबू जानी-संदीप खोसला, वरुण बहल, नीता लुल्ला, सब्यासाची, शंतनु-निखिल, तरुण तेहलानी हे डिझायनर्स ऑनलाइन वेबसाइट्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. डिझायनर्सच्या या प्रवाहाबद्दल सांगताना डिझायनर आरती विजय गुप्ताने सांगितले, ‘एक काळ होता जेव्हा लोकांना डिझायनर कलेक्शनबद्दल कुतूहल तर होते, पण ते उपलब्ध होऊ शकत नव्हते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज भारतात सोशल मीडियामुळे डिझायनर्सच्या कलेक्शन्सवर चर्चा होते आणि वेबसाइट्सच्या माध्यमातून ही कलेक्शन्स त्यांना विकतही घेता येतात. त्यामुळे हा उच्च मध्यमवर्गीय ग्राहक डिझायनर्सच्या जवळ आला आहे.’