वादविवादांनी भरलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा ११ वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. दहाव्या सिझनप्रमाणेच यावेळीही सेलिब्रिटी आणि नॉन- सेलिब्रिटी स्पर्धक शोमध्ये येतील. यंदाच्या या सिझनमध्ये ‘जमाई राजा’ मालिकेतील अभिनेत्री निया शर्मा सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून येणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तिला चक्क दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. पण, यावर नियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सध्या ती ‘खतरों के खिलाडी ८’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आहे. दरम्यान, या शोमध्ये ढिंच्यॅक पूजाही दिसण्याची शक्यता आहे. सेलिब्रिटी स्पर्धकांमध्ये ढिंच्यॅक पूजाला सर्वाधिक मानधन मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘जब हॅरी मेट सेजल’ची स्तुती केल्याने पाकिस्तानी कलाकार झाले ट्रोल

यंदाच्या सिझनमध्ये गेल्यावेळेप्रमाणे नॉन- सेलिब्रिटी स्पर्धक असणार आहेत. मात्र, या स्पर्धकांच्या करारामध्ये एक धक्कादायक बदल करण्यात आलाय. एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार नॉन- सेलिब्रिटी स्पर्धकांना यावेळी मानधन देण्यात येणार नाहीये. सामान्य नागरिकाला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळतो हीच बाब त्यांच्यासाठी मोठी असते, बहुधा असाच विचार करून बिग बॉसमध्ये हा मोठा बदल करण्यात आला असावा. मात्र, बिग बॉसने दिलेले टास्क उत्तम पद्धतीने पूर्ण केल्यास त्यांना पैसे जिंकण्याची संधी मिळेल. तसेच, टीआरपी वाढवण्यात ज्या स्पर्धकाचे सर्वाधिक योगदान राहिल त्यालाही बोनस स्वरुपात काही रक्कम देण्यात येईल.

वाचा : सरकारी जाहिरातींपासून ते सेन्सॉर बोर्डापर्यंतचा विद्याचा प्रवास

गेल्या काही सिझन्सपासून बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करताना दिसतोय. यावेळीही सूत्रसंचालनाची धुरा तोच सांभाळणार असून, ‘बिग बॉस ११’च्या प्रोमोचे त्याने मुंबईत चित्रीकरण केले.