अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत या चौकशीमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा अनेक दिग्गज कलाकारांची नाव समोर आली आहेत. त्यामुळे कलाविश्वात एकच चर्चा रंगली आहे. त्यातच बिग बॉस ११ ची विजेती शिल्पा शिंदेने ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे.

“ड्रग्सचं सेवन करणं हे चुकीचंच आहे. मात्र केवळ कलाविश्वातच या गोष्टी चालतात असं नाही. तर अन्य बऱ्याच क्षेत्रात ड्रग्सचं सेवन केलं जातं. मी काणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटी किंवा स्टारची बाजू घेत नाही. पण हे सगळ्याच क्षेत्रात होतं आणि आपल्या सगळ्यांना याविषयी माहिती आहे”, असं शिल्पा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “कलाविश्वात सगळ्या गोष्टी उघडपणे घडत असतात. तसंच कोणत्याही कलाकाराचं नाव घेणं सोपं आहे. त्यांच्याविषयी चर्चा करणं सोपं आहे. पण चाहत्यांनादेखील एखाद्या कलाकाराविषयी चर्चा करणं आवडतं. तसंच ज्यावेळी टॅलेंट कंपनी एखाद्या कलाकारासोबत करार करते त्यावेळी त्या सेलिब्रिटीची काळजी घेणे, त्याच्या गरजांकडे लक्ष देणं या कंपन्यांचं काम असतं. मात्र, या गोष्टी प्रत्येक व्यक्तीवर अवबलंबून आहेत”.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीला दीपिका पदुकोणविषयी माहिती मिळाली. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंह यांना समन्स जरी करून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. या वृत्ताला एनसीबीचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा यांनी दुजोरा दिला. दीपिकाला २५, तर श्रद्धा आणि सारा यांना २६ सप्टेंबरला हजर राहण्याबाबत कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.