रिअॅलिटी शो बिग बॉसचा लवकरच १२ वा सिझन येऊ घातला आहे. या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून येत आहे. बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी प्रेक्षकांनी कायमच अभिनेता सलमान खानला पसंती दिलेली आहे. मात्र, यावेळी सलमानबरोबर त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफदेखील साथ देणार असल्याची शक्यता बिग बॉसचा माजी स्पर्धक विकास गुप्ताने वर्तविली आहे.
बिग बॉसची सुरुवात २००६ मध्ये झाली. या कार्यक्रमामध्ये राजकारणी, क्रीडा, चित्रपटसृष्टी अशा अनेक क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा बिग बॉसच्या घरात प्रवेश होतो. या कार्यक्रमामध्ये पूर्वी केवळ प्रतिष्ठित क्षेत्रातील व्यक्तीच भाग घेऊ शकत होते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून सर्वसामान्य जनता देखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकत आहेत. तसेच यंदाच्या सिझनचे आकर्षण म्हणजे यात स्पर्धक जोडीने सहभाग घेऊ शकतात. थोडक्यात या जोडीमध्ये आई-मुलगा, बहिण-भाऊ हे देखील असू शकतात, असेही विकासने स्पष्ट केले. कदाचित बिग बॉसच्या याच नव्या संकल्पनेमुळे सलमान आणि कॅटची जोडी सूत्रसंचालनामध्ये झळकू शकते. मात्र कॅट आणि सलमानच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढणार आहे हे मात्र तितकेच खरे.
बिग बॉसच्या ११ व्या सिजनमध्ये कतरिना कैफने तिच्या टायगर जिंदा है या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी सलमान आणि कॅटने ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ या गाण्यावर ठेका धरला होता. मात्र यावेळी देखील कॅट सलमानला साथ देणार का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2018 2:29 pm