२००२ साली ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेली मुलगी म्हणजे शेफाली जरीवाल. जुन्या गाण्याचे रिमिक्स करून तयार करण्यात आलेले ‘कांटा लगा..’ हे गाणे त्यावेळी सर्वांच्याच आवडीचे झाले होते. डिस्कोपासून पार्ट्यांपर्यंत तसेच अगदी हळदी समारंभातही हे गाणं वाजवलं जायचं. या गाण्यामुळे शेफाली रातोरात प्रसिद्ध झाली आणि लोक तिला ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखू लागले. सध्या शेफाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेफाली लवकरच आई होणार आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, शेफाली आणि तिचा पती पराग त्यागी यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीमध्ये शेफालीने मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. “वयाच्या १०व्या – ११ व्या वर्षी मला मूल दत्तक घेण्याचा अर्थ समजला. तेव्हापासून मला एक मूल दत्तक घ्यायचं होतं. खरं तर जेव्हा तुम्हाला स्वत: ची मुलं असतात तेव्हा असा निर्णय घेणं फार कठीण असतं. बऱ्याचदा समाजाचा दबावदेखील असतो. परंतु मी आणि पराग आमच्या निर्णयावर ठाम आहोत. आम्हाला एक मुलगी दत्तक घ्यायची आहे. सध्या बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. बाळ दत्तक घेताना कागदोपत्री व्यवहार फार असतो. मात्र ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे”, असं शिफालीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, आम्ही नवरा-बायको असण्यापूर्वी एकमेकांचे चांगले मित्र आहोत. त्यामुळे एकमेकांचे विचार नीट समजूनच कोणताही निर्णय घेतो.

वाचा : मस्करीत म्हणाली ‘चल लग्न करुया अन्….’; किशोरी शहाणेंची लव्ह स्टोरी

दरम्यान, शेफाली नुकतीच ‘बिग बॉस १३’च्या घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा सुरु आहे. शेफालीने छोट्या पडद्यावरील अभिनेता पराग त्यागीसोबत लग्न केलं आहे. तिचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी तिने हरमीत गुलजारशी लग्न केलं होतं. मात्र काही कारणास्तव ते विभक्त झाले. त्यानंतर २०१५ मध्ये शेफालीने परागशी लग्न केलं.