‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाचे पाच दिवस ऊलटले असून, ‘बिग बॉस’च्या घरातील तणाव आणि वातावरणातली गरमा-गरमी वाढायला लागली आहे. मॉडेल उपेन पटेल आणि सुकिर्ती खंडपाल यांच्यात जवळीक वाढत असताना अचानक ते एकमेकांपासून दूर गेले. तर, दुसऱ्या बाजूला मॉडेल डिआंड्रा सोआरेस आणि गौतम गुलाटी दिवसागणिक एकमेकांजवळ येताना दिसत आहे. एक आठवडा पुरेल इतकेच किराणा सामान असलेले घरातील स्वयंपाकघर उघडताच, घरातील सदस्यांमध्ये खाण्यापिण्यावरून वादाला तोंड फुटले. करिश्मा तन्ना, मिनिषा लांबा आणि सोनी सिंग स्वयंपाकघराचा ताबा घेतात. त्यांच्या या अशा अधिकारशाहीच्या वागण्याने घरातील काही सदस्य त्यांच्यावर नाराज होतात. या सर्व प्रकारात ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वातील पहिला नामांकनाचा पडाव येऊन ठेपतो. घरातील सर्व सदस्यांना इतर सदस्यांसमोर त्यांना घरात नको असलेल्या सदस्याचे नामांकन करण्यासाठी एकामागून एक बोलाविले जाते. यावेळी नामांकीत झालेल्या त्या सदस्याच्या नावाची घोषणा करण्याबरोबरच त्याचे छायाचित्रदेखील जाळून टाकण्यास सांगण्यात येते. एका बाजूला छोट्याशा गैरसमजावरून उपेन पटेल आश्चर्यकारकरित्या सुकिर्ती खंडपालचे नामांकन करतो, तर दुसऱ्याबाजूला आर्य बब्बर सोनाली राऊतला नामांकीत करतो. घरातील बरेचसे सदस्य सैबेरीयन मॉडेल नताशा स्टानकोव्हिकचे नामांकन करतात. घरातील तिखट खाण्याचा नताशाला त्रास होत आहे. नताशाला ६ मत मिळाली असून, सुकिर्ती ५ मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. घरातील सदस्यांबरोबर सुर जुळविण्यात सुकिर्तीला कठीण जात आहे. याशिवाय आठव्या पर्वात सुरू करण्यात आलेल्या ‘सिक्रेट सोसायटी’ला त्यांना वाटणाऱ्या घरातील दोन अन्य सदस्यांचे नामांकन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. आपल्या अधिकाराचा वापर करत ते सोनाली राऊत आणि गौतम गुलाटीचे नामांकन करतात. घरातील अन्य सदस्यांबरोबरच्या त्यांच्या गैरवर्तणूकीमुळे सिक्रेट सोसायटी त्यांचे नामांकन करते. नामांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घरातील सदस्यांमध्ये नैराश्य आणि मतभेत दिसून येतात. ‘बिग बॉस’च्या घरातील दिवसभराच्या कार्यकाळात वारंवार समज देऊन देखील पुन्हा पुन्हा इंग्रजीत बोलण्यावरून सोनाली राऊतला, तर एका कार्यादरम्यान दिवसा झोपलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गौतम गुलाटीला शिक्षा ठोठावण्यात येते. एकंदर काय तर ‘बिग बॉस’च्या घरात युध्दभूमीची सिमा आखण्यात आली असून, खऱ्या आर्थाने खेळाला सुरवात झाली आहे. इथून पुढे ‘बिग बॉस-८’ चे विमान कुठल्या दिशेने उड्डाण करेल, हे पाहाणे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी नक्कीच मनोरंजनात्मक असेल.