बिग बॉस (सीझन ७) येत्या १४ सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर सुरू होणार आह़े त्याला प्राइम टाइम मिळावा म्हणून ‘संस्कार धरोहर अपनों की’ आणि ‘ना बोले तुम ना मैनें कुछ कहा’ या दोन मालिका बंद करण्यात येणार आहेत.
सध्या कलर्सवर सुरू असलेला ‘झलक दिखला जा’ हा रिअ‍ॅलिटी शो अंतिम टप्प्यात आहे. त्याची जागा लवकरच बिग बॉस ७ घेणार आहे. परंतु ‘बिग बॉस’ प्राइम टाइम मिळावा यासाठी कलर्सवरील आणखी दोन मालिका बंद करण्यात येणार आहे.
या मालिका का बंद करण्यात येत आहे या संदर्भात चॅनेलमधील मंडळी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत. परंतु दोन्ही निर्मिती संस्था मात्र या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मात्र नाराज आहेत, अशी माहिती सेटवरील सूत्रांनी दिली. ‘संस्कार धरोहर अपनों की’ या मालिकेचा टीआरपी चांगला असताना ही मालिका अचानक बंद करण्यात येत असल्यामुळे मालिकेतील कलाकारांमध्येही नाराजी आहे. नुकतीच या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या जागी कादंबरी कदम हिने काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु आता मात्र अचानक वाहिनीने घेतलेल्या या निर्णयामुळे शुटींगमध्येही बदल करावे लागत आहेत.
बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो चॅनेलसाठी आर्थिक गणितांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रिअ‍ॅलिटी शोमुळे चॅनेलला मिळणारे आर्थिक उत्पन्न इतर मालिकांच्या मानाने किमान चारपट अधिक असल्याचे बोलले जात आहे. शिवाय या बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमधून इतर चित्रपटांचे प्रमोशन केले जाते त्याचे दरही काही कोटींमध्ये आहेत. या संदर्भात कलर्स वाहिनीचे विक डे प्रोग्रॅमिंग हेड प्रशांत भट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मालिका बंद होत असलेल्या वृत्ताला दुजोरा दिला.