छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध खलनायिका म्हणून काम्या पंजाबीकडे पाहिले जाते. ‘बिग बॉस ७’ ची विजेती असलेली टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीला राजकारणात फार रस आहे. याबद्दल ती आता गांभीर्याने विचार करत असून राजकारणात प्रवेश करण्याच्या काम्याचा मानस आहे. काम्याच्या मते, देशातील महिलांविरोधात होणाऱ्या अत्यांचारांविरोधात तिला काम करायचे आहे.

‘परवरिश’ आणि ‘बेइंतेहा’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या काम्याच्या मते, राजकारणात प्रवेश करणं हे काही वाईट नाही. उलट राजकारण हे सर्वात आव्हानात्मक आहे. इथे फार मेहनत घ्यावी लागते. इथे फक्त तुमच्या ताकदीचीच नाही तर व्यक्तिमत्त्वाचीही परीक्षा लागते. काम्याला, महिलांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे. आता तिचे हे स्वप्न कधी पूर्ण होणार हे तर येणारा काळच ठरवेल.

काम्याने काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ११’ ची स्पर्धक हिना खानला खडेबोल सुनावले होते. हिनाने टीव्ही जगतातील अनेक अभिनेत्रींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अनेक कलाकारांचा रोष ओढावून घेतला होता. बिग बॉसमध्ये हिनाने, ‘माझ्यासारखं आधी होऊन दाखवा…’ असे तोऱ्यात म्हटले होते. यावर प्रेक्षकांना प्रश्न विचारताना काम्याने ट्विट करत म्हटले की, ‘कोणाला हिनासारखे व्हायचे आहे त्यांनी हात वर करावा…’

दरम्यान काम्याने शिल्पा शिंदेलाही टोमणा मारत म्हटले होते की, बिग बॉसच्या घरात फक्त भांडणंच करत राहिली तर आयुष्यभर तिला घरातच राहावं लागेल.