१५ कलाकार आणि शंभर दिवसांचा खेळ

जगभरात ९२ पेक्षा जास्त देशांमध्ये लोकप्रिय ठरलेला, आपल्याक डेही हिंदी, बांगला, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये अवतार धारण करून टीआरपीत सर्वोत्तम ठरलेला ‘बिग बॉस’ हा रिअ‍ॅलिटी शो आता मराठीतही प्रवेश करता झाला आहे. महेश मांजरेकर या मराठी ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन करणार असून १५ एप्रिलला १५ कलाकारांना शंभर दिवसांसाठी ‘बिग बॉस’च्या घरात एकत्र आणून रंगवला जाणारा हा खेळ ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर पाहता येणार आहे.

‘बिग बॉस’ची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण कलाकार असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यR माच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये अनेक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत असणार आहेत १५ कलाकार. या घरामध्ये कलाकारांना अनेक अडचणींवर मात करावी लागणार आहे. तसेच त्यांच्या अनेक सवयींना मुरडही घालावी लागणार आहे. इथे मोबाइल नसेल, टीव्हीसुद्धा नसेल आणि पुस्तकं वाचण्याची किंवा काहीही लिहिण्याची संधीदेखील नसेल. अशा सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त त्यांना या घरामध्ये एकमेकांबरोबर शंभर दिवस राहायचं म्हणजे काही सोपं नाही! आजपर्यंत पडद्यावर त्यांची अनेक रूपं प्रेक्षकांनी पाहिली आहेत, पण आता उलगडणार त्यांचं खरं रूप. कारण बिग बॉसच्या या घरामध्ये दिसतं.. तसंच असतं!

‘बिग बॉस’चे बांगला आणि कन्नड भाषांमध्ये यशस्वी पर्व सादर केल्यानंतर ‘व्हायकॉम१८ चे प्रादेशिक मनोरंजन विभागाचे प्रमुख रवीश कुमार म्हणाले, ‘या कार्यक्रमाने गेल्या बऱ्याच वर्षांपासून सगळ्या भाषांमध्ये, सर्वच देशांमध्ये त्याच्या हक्काचा, विश्वासू असा एक प्रेक्षकवर्ग मिळवला आहे. काही वर्षांपासून मराठी प्रेक्षकवर्गामध्ये बरीच वाढ झालेली असून त्याचे श्रेय कार्यक्रमांना जाते. जगभरामध्ये यशस्वी पर्व सादर करून आता आम्ही ‘बिग बॉस’ मराठी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊ न येत आहोत. यातील  स्पर्धकांमधली चुरस, त्यांच्या भावभावना आणि शोची भव्यता प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल’.  ‘बिग बॉस’च्या या मराठमोळ्या रूपाबद्दल बोलताना ‘कलर्स मराठी’चे व्यवसायप्रमुख निखिल साने म्हणाले की ‘बिग बॉस’ शोची स्वत:ची अशी ओळख आहे.  मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून आता त्याची आवड बदलते आहे हे लक्षात आल्यावर आम्ही आमच्या नॉन फिक्शन कार्यक्रमांचा साचा बदलण्याचा विचार केला, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल.

खरंतर तरुणांना आवडतील अशा संकल्पनांवरच्या कार्यक्रमांवर आमचा भर असतो त्यामुळे इथेही स्पर्धकांची निवड करताना आम्ही २५ ते ६५ वयोगटातील कलाकार निवडले आहेत. महेश मांजरेकर यांनी कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली आहे. घरामधील या कलंदर कलाकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिशय अनुभवी, त्यांच्याबरोबर संयम राखून त्यांना सांभाळून घेऊ  शकेल अशा सूत्रसंचालकाच्या शोधात आम्ही होतो. महेश मांजरेकर यांनी या भूमिकेसाठी होकार दिल्याचा आनंद वाटतो.’ बिग बॉसचे सूत्रसंचालन सलमान खान, मिथुन चक्रवर्ती, सुदीप आणि कमल हसन यांसारख्या लोकप्रिय कलाकारांनी केले आहे. त्यामुळे मला ही सूत्रसंचालकाची भूमिका मिळाल्याचा आनंद वाटतो.

या शोसाठी पूर्वतयारी तयारी करणे अशक्य आहे. यात मानवी भावभावनांचा खेळ आहे त्यामुळे अनिश्चित वळणंही शोमध्ये असतील. विशेष म्हणजे कुठल्याही संहितेवर आधारित नसलेला असा हा शो असल्याने त्यातला उत्स्फूर्तपणा मला खूप महत्त्वाचा वाटतो, अशी भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. तर हिंदीप्रमाणेच बिग बॉस मराठीचे स्पर्धकसुद्धा लोणावळा येथील घरामध्ये राहणार आहेत. बिग बॉस मराठीचे भव्य आणि सुंदर घर स्पर्धक तसेच प्रेक्षकांसाठी सरप्राइज असेल, अशी माहिती एंडेमॉल शाइन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक रेगे यांनी दिली.  १५ एप्रिलपासून संध्या. ७ वाजता तसेच त्यानंतरचे भाग दर सोम. ते शनि. रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर पाहता येणार आहेत.