News Flash

‘बिग बॉस’च्या घरात दडलंय काय?

घरातील सदस्यांची निवड करणारे आनंद चव्हाण यांनी ‘बिग बॉस’च्या घरामागे दडलेली गुपितं उलगडून सांगितली..

|| रेश्मा राईकवार

कोटय़वधींची उलाढाल करणारा, प्रत्येक समाजाची एक सभ्यता, नैतिकता असते ती मुळापासून उखडून टाकत एरवी ग्लॅमरच्या वलयात हरवलेल्या चेहऱ्यांमागचा खरा चेहरा उलगडणारा शो म्हणून ‘बिग बॉस’ची ख्याती आहे. हिंदीत गेली काही वर्ष सातत्याने टीआरपीच्या गणितांत नंबर वन राहिलेला हा शो गेल्याच महिन्यात मराठी अवतार धारण करून प्रेक्षकांसमोर आला आहे. अगदी पहिल्याच आठवडय़ापासून या मराठी बिग बॉसच्या घरात शिरलेल्या पाहुण्यांचे ‘टास्क’ पाहून बंद करा हा मूर्खपणा इथपासून शोची रंगत वाढवण्यासाठी मुद्दाम त्यांना हे प्रेमप्रकरण वगैरे करायला लावतायेत, सगळं ठरलेलंच असतं त्यांचं अशी टीकाही होऊ लागली आहे. इतक्या सगळ्या टोकाच्या विरोधात शोचा टीरआपी वाढतोय हेही तितकंच खरं आहे. या पाश्र्वभूमीवर ‘बिग बॉस’च्या अगदी पहिल्या शोपासून जो सोनी वाहिनीवर ‘बिग ब्रदर’ नावाने प्रदर्शित झाला होता तेव्हापासून या घरातील सदस्यांची निवड करणारे आनंद चव्हाण यांनी ‘बिग बॉस’च्या घरामागे दडलेली गुपितं उलगडून सांगितली..

गेली अकरा वर्ष ‘एंडेमॉल इंडिया’बरोबर ‘बिग बॉस’शोसाठी टॅलेंट हेड म्हणून काम करणारे आनंद चव्हाण आता त्यांच्या स्वतंत्र कंपनीअंतर्गत सर्जनशील दिग्दर्शक आणि प्रकल्प प्रमुख म्हणून मराठी ‘बिग बॉस’ची सूत्रं सांभाळत आहेत. मुळात टॅलेंट हंट हे वारं आपल्याकडे रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून आलं. आनंद चव्हाण यांचा या पदापर्यंतचा प्रवासही तितकाच गमतीशीर आहे. ‘मी २००४ मध्ये ‘कौंटिल्य प्रॉडक्शन’बरोबर काम करत होतो. त्या वेळी ‘ग्रेट इंडियन कॉमेडी’ शो सुरू होता ज्यात विनय पाठक, रणवीर शौरी, गौरव गेरा यांसारखे चांगले कलाकार होते. या शोमध्ये छोटे-छोटे स्किट्स असायचे आणि त्यासाठी कलाकारांच्या तारखांपासून त्यांच्या कामाचा समन्वय साधण्याचे काम मी करत होतो. त्याच वेळी ‘स्टार वन’वर ‘लाफ्टर चॅलेंज’ शो सुरू झाला होता आणि त्या शोच्या शेवटी एक अंडय़ासारखं चिन्ह यायचं. ते ‘एंडेमॉल प्रॉडक्शन’चं होतं. ज्यांनी ‘बिग बॉस’ शो भारतात आणला. कधीतरी या कंपनीत काम करायचं असा विचार मनात होता. मी तिथे जाऊन बसायचो पण त्यांचे प्रमुख होते दीपक धर त्यांच्याशी काही बोलणं होत नव्हतं, असं चव्हाण सांगतात. मात्र ते सतत भेटीसाठी येतायेत ही गोष्ट अखेर त्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी चव्हाण यांची चौकशी केली. ‘माझ्या कामाचं स्वरूप लक्षात आल्यानंतर त्यांनी मला ‘फीअर फॅक्टर’ हा शो अर्जेटिनामध्ये शूट होणार होता. त्यासाठी तिथे जाऊ शकतील अशा पन्नास कलाकारांची नावं द्यायला सांगितली. पाच वाजता मी तिथे गेलो होतो. रात्री दहा वाजेपर्यंत मी तिथेच बसून नावं काढली आणि त्यांना यादी दिली. ती यादी पाहिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामावर यायला सांगितलं’, ‘एंडेमॉल’चा हा अनुभव सांगतानाच या कंपनीत आपली जागा आपण निर्माण केली असं ते अभिमानाने सांगतात.

२००६ मध्ये भारतात ही कंपनी पहिल्यांदा सुरू झाली होती. त्यानंतर दोन-तीन महिन्यांतच एक असा शो येतोय जिथे काहीच करायचं नाही आहे, एका घरात राहायचंय आणि त्या घरात राहण्यासाठी पैसे मिळणार आहेत, अशा शोची कल्पना आम्हाला दिली गेली. तुम्हाला खोटं वाटेल पण त्या वेळी या शोसाठी आम्ही शाहरूख खानचंही नाव काढलं होतं. अर्थात हळहळू जशी या शोची संकल्पना स्पष्ट होत गेली तसतसं ‘बिग बॉस’ आकार घेत गेलं असं ते सांगतात. ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वासाठी कलाकार निवडतानाच नेहमीचे टेलीव्हिजनवर दिसणारे चेहरे नकोत, हा विचार कायम होता. म्हणून मग या शोमध्ये राखी सावंतला आणलं, रवी किशन हे त्या वेळी भोजपुरीमध्ये काम करत होते मात्र फार लोकप्रिय नव्हते. पण मिथुनसारखं त्यांचं राहणं, वावरणं यामुळे ते लवकरच लोकप्रिय होणार याची मला खात्री होती. त्यामुळे ते त्या वेळी बिग बॉसच्या घरात आले. घरातल्या सदस्यांनंतर निवेदकाचा शोध सुरू झाला. त्या वेळी आम्ही अर्शद वारसीला विचारणा केली. अर्थातच मुन्नाभाईची हवा असल्याने त्याने नाहीच सांगितलं होतं, पण हा तुझ्याच ताकदीचा शो आहे, असे सांगत अखेर आम्ही त्याला राजी केले आणि हा शो पहिल्यांदा सोनी टीव्हीवर प्रदर्शित झाला,’ अशी आठवण आनंद यांनी सांगितली.

रिअ‍ॅलिटीची पाळंमुळं खरी तिथे रुजली असं ते म्हणतात. रिअ‍ॅलिटी म्हणजे वास्तव आणि या शोच्या फॉर्मेटमध्येच ती ताकद आहे ज्यात फक्त  वास्तवच समोर येतं, असं ते सांगतात. या शोच्या यशाचं श्रेय हे फॉर्मेट बनवणाऱ्या मूळ डच शोचा कल्पनाकार जॉन डे मोलला असल्याचं ते सांगतात. हा शो २००८ मध्ये ‘कलर्स’ वाहिनीवर आला. या शोचं वास्तवच असं आहे की कितीही छोटा-मोठा कलाकार असेल त्याला बिग बॉसच्या घरात आणायचं असेल तर त्याला पटवून देण्यासाठी निदान तीन-चार तासांचा वेळ लागतो, अगदी त्या कलाकाराने स्वत:हून यायची तयारी दाखवली असली तरी अंतिम होकार यायला तेवढा वेळ लागतोच, असं ते म्हणतात. मग त्यांना शोची माहिती देण्याच्या निमित्ताने जेव्हा भेटीगाठी होतात तेव्हा त्यांची व्यक्तिरेखा काय आहे हे स्पष्ट होत जातं आणि मग त्याआधारे ही व्यक्ती जर घरात असेल तर ती कशी वागेल, याचा विचार करूनच मग योग्य त्या माणसांची निवड केली जाते, असं त्यांनी सांगितलं. गेल्या अकरा वर्षांत प्रत्येक शोसाठी कमीतकमी वीस जणांशी तरी बोलणी होतात, करार होतो. या हिशोबाने आत्तापर्यंत निदान दोनशे व्यक्ती या बिग बॉसच्या घरात राहून गेल्या आहेत, असं ते मिश्कीलपणे सांगतात.

रिअ‍ॅलिटी

‘बिग बॉस’ हा शो हिंदीत लोकप्रिय आहे, कलाकारांसाठी ते मोठं व्यासपीठ आहे असं असूनही मराठीत हा शो यायला वेळ लागला आणि दुसरं म्हणजे लोकप्रिय असूनही अनेकदा सेलिब्रिटिज या शोमध्ये जाण्यासाठी घाबरतात, यामागची कारणं स्पष्ट करतानाही मुळातच शोची संकल्पनाच भीतीदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. या शोचा फॉर्मेट मोठय़ा हुशारीने आणि नीट विचारपूर्वक बनवण्यात आला आहे. आता मराठी ‘बिग बॉस’चंच उदाहरण घ्या ना.. १४ सेलिब्रिटी १४ आठवडय़ांसाठी एकाच घरात बंद आहेत. १४ आठवडय़ांसाठी आपण एका घरात, जगापासून दूर बंद झालो तर ही कल्पना सध्याच्या काळात तर खूपच घाबरवणारी आहे. आणि मग अशाप्रकारे राहायला लागलं तर आपण लोकांसमोर उघडे पडू ही शक्यता इतकी सहज दिसते की त्यामुळे पहिला नकारच येतो, असं ते म्हणतात.

भारतीय टेलीव्हिजनवर हा एकमेव अवघड शो आहे ज्यासाठी कलाकार किंवा माणसं मिळत नाहीत, असं ते म्हणतात. या शोबद्दल आणि विशेषत: मराठी ‘बिग बॉस’ सुरू झाल्यापासून हा शो ठरवलेलाच असतो हा सूर जास्त असतो याबद्दल विचारलं असता मुळात सूत्रसंचालकाचा निरोप घेऊन, त्यांना माईक लावून आत सोडलं की त्यांच्याशी आमचा काहीही संबंध राहात नाही, असं ते सांगतात. आम्ही रोज रात्री बसवून त्यांना कसं वागावं हे सांगतो वगैरे असे खूप गैरसमज आहेत, मात्र शोमधले जे टास्क आहेत ते काही आंतरराष्ट्रीय आहेत तर काही इथे ठरवलेले असतात. त्याचं कारणच मुळात या शोमध्ये दर एक तासांनी परिस्थिती बदललेली दिसते. पुढे कुठला सदस्य कोणाशी कसा वागणार हे माहिती नसतं. त्यामुळे त्यांच्या कृतींवर टास्क आणि इतर गोष्टी अवलंबून असतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. इतकंच कशाला सूत्रसंचालकांनाही फक्त आठवडय़ात झालेल्या ठळक घडामोडी दाखवलेल्या असतात. त्यांना त्यातून नेमकं काय करायचं हे लक्षात येतं आणि ते आपल्या पद्धतीने एपिसोड करतात. कारण, प्रश्न तुम्ही त्यांना लिहून द्याल. पण मांजरेकरांच्या अमुक एका प्रश्नावर रेशम असंच बोलेल किंवा मेधा बोलेल की आणखी कोण काय बोलेल हे त्यांनाही माहिती नसतं. समोरून जी उत्तरं येतात त्यावर मग सूत्रसंचालक आपली भूमिका ठरवतात, असं सांगणाऱ्या आनंद यांनी हा शो कुठल्याही प्रकारे आधी लिहिलेला किंवा नियोजित नसतो, असा ठाम दावा केला. याच संदर्भात त्यांनी डॉली बिंद्राचा अनुभव सांगितला. डॉलीला काहीतरी बोलला म्हणून बिग बॉसने त्या वेळी समीर सोनीला तिला २५ वेळा स्वीमिंग पूलमध्ये उतरून, पाण्यात डुबकी मारून वर यायचं, पूलच्या बाहेर पडायचं आणि सॉरी म्हणायचं अशी शिक्षा दिली होती. आता डॉली त्या वेळी स्वीमिंग पूलच्या बाजूला बसू शकली असती. त्या वेळी थंडीचा मोसम होता, लोणावळ्यातली थंडी.. डॉली थेट दिवाणखान्यात जाऊन बसली. त्यामुळे बिचाऱ्या समीरला स्वीमिंग पूल ते दिवाणखाना असं करून ही शिक्षा पूर्ण करावी लागली. अर्थात हे पाहिल्यावर बिग बॉसनेच डॉलीला ही कल्पना दिली असा लोकांचा समज होतो, मात्र मुळात तिचा स्वभाव आहे जो तिच्या या कृतीतून दिसतो. त्यामुळे हा शो या सदस्यांच्या स्वभावावरच अवलंबून आहे हे तुमच्या लक्षात येईल, असं ते सांगतात. सदस्य चांगले नसतील तर शो फसतो.. हे सांगतानाच ‘कलर्स मराठी’ने हा शो स्वीकारण्याचे धाडस केले आहे, असं ते म्हणतात.

मुळात हा शो म्हणजे एक खेळ आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि खेळासारखाच त्याचा आनंद घ्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. खोखोच्या खेळात एखाद्याला खो दिल्याशिवाय आपल्याला जागा मिळत नाही. इथे या शोमध्ये आपली जागा आपल्यालाच निर्माण करावी लागते आणि त्या जिद्दीतून मग ते घरातील कारनामे रंगतात, हे स्पष्ट करताना मराठी ‘बिग बॉस’ ही त्याच दृष्टीने पाहिला तर प्रेक्षकांना त्यातली गंमत कळेल, असं त्यांनी सांगितलं. सध्या या शोसाठी पडद्यामागे ३०० मराठी मुलं-मुली कार्यरत आहेत, ज्यांना या शोसाठी खास प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलं आहे, असंही आनंद यांनी सांगितलं. गेली अकरा वर्ष त्यांनी टॅलेंट हेड म्हणून या शोची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. या प्रवासात एंडेमॉल शाईन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक रेगे यांचं मोलाचं सहकार्य मिळाल्याचं ते आवर्जून नमूद करतात. आता त्यांनी ‘ऑफबीट मीडिया गाइड’ म्हणून स्वत:ची कंपनी सुरू केली असून त्याअंतर्गत त्यांनी ‘बालक पालक’ या चित्रपटाचे तमिळ आणि तेलुगू रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. आता निर्माता म्हणून नव्या भूमिकेत ते शिरले आहे, मात्र त्याचबरोबर ‘बिग बॉस’च्या घरामागची सूत्रं हलवण्यातली त्यांची हातोटी असल्याने तिथेही ते त्याच भूमिकेतून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 2:26 am

Web Title: bigg boss marathi
Next Stories
1 अभिनय ते दिग्दर्शन मराठी कलाकारांची घोडदौड
2 तरुण प्रेमप्रवास!
3 ‘आयर्न मॅन’चा सूट चोरीस
Just Now!
X