बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व आता रंगतदार वळणावर येऊन ठेपलं आहे. या घरामध्ये सदस्यांनी प्रवेश करुन बरेच आठवडे लोटले आहेत. या काळामध्ये घरात अनेक घडामोडी घडल्या. अनेकांना घरातून बाहेर जावं लागलं. तर आजारपणाचं कारण देऊन घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची घरात एण्ट्री झाली. त्यानंतर आता घरात पुन्हा एकदा वाईल्ड कार्डच्या माध्यमातून आरोह वेलणकर या नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता घरातलं चित्र पुन्हा एकदा बदलणार असल्याचं दिसून येत आहे.

वाईल्ड कार्डच्या माध्यमातून आरोहने घरात प्रवेश केल्यानंतर घरातील सदस्य आणि चाहत्यांमध्ये त्याच्याविषयी प्रचंड उत्सुकता दाटून आली होती. हा आरोह नक्की कोण आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आरोह हा काही मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये झळकला असून आता तो बिग बॉसचं घर गाजवायला सज्ज झाला आहे.

प्रविण तरडे लिखित आणि अभिजीत पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ या चित्रपटातून आरोहने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याचं अभिनयामुळे त्याला ‘घंटा’ हा चित्रपट मिळाला. या दोन्ही चित्रपटातील त्याच्या अभिनयाची चर्चा झाली. सध्या आरोह रंगभूमीवर ‘व्हाय सो गंभीर’ या नाटकामध्ये काम करत असून तो मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मोठा पडदा आणि रंगभूमीनंतर त्याने आता बिग बॉसच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं आहे.

“मला बिग बॉस हा शो खूप आवडतो. त्यामुळे जेव्हा बिग बॉसच्या घरात जाण्याची संधी आली तेव्हा मी लगेच ती स्विकारली. आम्ही कलाकार म्हणून जेव्हा काम करतो. तेव्हा माणूस म्हणून कसे आहोत, हे चाहत्यांना माहित नसते. बिग बॉस हा एकुलता एक शो आहे, ज्यामुळे माणूस म्हणून आम्ही कसे आहोत, हे २४ तास कॅमे-यासमोर राहून प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. कारण इथे जसं दिसतं तसंच असतं,” असं आरोहने सांगितलं.

आरोह वेलणकरच्या धमाकेदार एन्ट्रीने बिग बॉसने घरच्यांना सरप्राइज दिले. आरोहच्या येण्याने बिग बॉस मराठीमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. नेहा शितोळे, माधव देवचके आणि शिवानी सुर्वे या आरोहच्या मित्रांनी तर आरोहचे आनंदाने स्वागत केलेच आहे. पण आरोहला पहिल्यांदाच भेटलेल्या वैशाली म्हाडे आणि अभिजीत केळकर यांच्या बोलण्यावरूनही त्यांना आरोह आवडला असल्याचेच दिसून आले.