मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी खंडणी प्रकरणातील जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणात सातारा सत्र न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर आता बिचुकलेंनी जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

अभिजीत बिचुकले हे मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्याचे म्हणत सातारा सत्र न्यायालयाने त्यांचा जामिन अर्ज फेटाळला होता. बिचुकलेंना २१ जून रोजी बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीने बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती.

चेक बाऊन्स प्रकरणी जामिन मिळाल्यानंतर पोलिसांनी बिचुकलेंना खंडणी प्रकरणात अटक केली होती. खंडणी प्रकरणात जामिन फेटाळत न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

कोण आहेत अभिजीत बिचुकले?
स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेंनी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आहेत. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले आहेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिले आहे.