बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन एक आठवडा उलटला आहे. या घरामध्ये रोज नवनवीन घटना घडत असतात. कधी टास्क रंगतात, तर कधी घरातल्यांची भांडणं. या भांडणामध्ये नेहा कायमच अग्रेसर असल्याचं पाहायला मिळतं. नेहाचं जवळपास घरातल्या प्रत्येक सदस्यासोबत एकदा तरी भांडण झालं आहे. त्यातच आता तिच्यात आणि सुरेखा पुणेकर यांच्यात वाद झाल्याचं दिसून येत आहे.
घरातल्या सदस्यांना सोपविण्यात आलेल्या नव्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखा पुणेकर यांच्यात वाद होणार आहेत. हे कार्य स्विमिंग पुलमध्ये रंगणार असून नेहाने पूलमध्ये साबणाचं पाणी टाकल्यामुळे हा वाद सुरु झाला आहे.

स्विमिंग पूलमध्ये वीणा आणि माधव उभे असून त्यांच्या समोर विरुद्ध टीमचे सदस्य आहेत. जे या दोघांवर पाणी टाकत आहेत. यावेळी नेहाने त्यांच्यावर साबणाचं पाणी टाकलं. जे पाहून सुरेखा यांनी नेहाला असं करु नकोस म्हणून बजावलं. सुरेखा यांनी हे सांगितल्यानंतर नेहा संतापली आणि तिने सुरेखा यांना प्रत्युत्तर दिलं. नेहाचं हे वर्तन पाहून अभिजीत केळकरने तिला शांत राहण्यास सांगितलं. मात्र तिची अखंड बडबड सुरुच होती. यावेळी तिने सुरेखा यांच्यावर अनेक आरोपही केले. त्यावर सुरेखा यांनीही नेहाला सडेतोड उत्तर दिलं आहे.

दरम्यान, या आठवड्यामध्ये वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे घरातील कोणताही सदस्य बाहेर गेलेला नाही. त्यामुळे सध्या घरात आनंदाचं वातावरण आहे.