बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. घरामध्ये नवनवीन टास्क रंगायला सुरुवात झाली आहे. एकाहून एक नवनवीन टास्क सुरु असतानाच बिग बॉसने घरातल्या सदस्यांना ‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे नवीन साप्ताहिक कार्य दिलं आहे. या कार्यामध्ये घरातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडताना पाहायला मिळणार आहे. आपलं मत थेट मांडणाऱ्या नेहा शितोळेचं यावेळी घरातील सदस्यासोबत पुन्हा एकदा वाद होणार आहे.
‘शाळा सुटली, पाटी फुटली’ या टास्कमध्ये सदस्यांना शालेय विद्यार्थ्यांचे कपडे परिधान करावे लागणार आहेत. या टास्क दरम्यान मज्जा तर होईलच पण त्यासोबत भांडण देखील बघायला मिळणार आहे. शाळा म्हटलं की लहान मुल खोड्या काढणारच. त्यामुळे मस्ती करणाऱ्या नेहाला टास्कमध्ये कान पकडून उभ रहाण्याची शिक्षा मिळाली आहे. मात्र शिक्षा करुनही ऐकत नसल्यामुळे शिव नेहाला खडू फेकून मारतो. यानंतर शिव आणि नेहामध्ये वाद होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शिवने हिंसा केल्याची तक्रार नेहाने बिग बॉसकडे केली आहे.
दरम्यान, नेहाने बिग बॉसकडे तक्रार केल्यानंतर शिवनेदेखील नेहाला सडेतोड उत्तर दिलं आहे. आता जर हिने गुन्हा केला तर हिला शाळेतून बाहेर काढाव लागेल, असं शिव म्हणतो. त्याच्या या वक्तव्यानंतर नेहा आणि शिवमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला आहे. त्यातच शिवने नेहाचे संस्कार काढल्यामुळे नेहा चांगलीच संतापली आहे. याप्रकरणी नेहाने शिवला तिच्या घरातल्यांची माफी देखील मागण्यास सांगितलं आहे, मात्र शिवने माफी मागण्यास नकार दिला आहे. हे भांडण थांबविण्यासाठी किशोरी शहाणे प्रयत्न करत आहेत. आता बघू हे भांडण किती विकोपाला जातं. त्यामुळे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2019 2:29 pm