‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व सुरू झालं आहे आणि घरात सध्या नॉमिनेशन टास्क, वाद – विवाद, भांडण, मतभेद, मैत्री अशा गोष्टी दिसून येत आहेत. त्यातच आता बिग बॉसने सदस्यांना खूपच मजेशीर टास्क दिलं आहे. सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क सदस्यांमध्ये रंगत आहे.

सुरेखा पुणेकर – विद्याधर जोशी, किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे. ज्यामध्ये या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हान देणार आहे. बिग बॉस नेहमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतो. हे आव्हानदेखील तितकंच वेगळं आणि कठीण असणार आहे. विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांना विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे. हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे. हे बघायला गंमत येणार हे नक्की.

वाचा : ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विध्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताई विद्याधर यांना ‘या रावजी’ ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजीत केळकरला ‘अशी ही बनवा बनवी’ या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत. या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकंफुलकं होईल यात शंका नाही.