‘बिग बॉस मराठी २’च्या घरात सध्या कुटुंबीयांसाठी विशेष आठवडा साजरा करण्यात येत आहे. घरातील स्पर्धकांचे कुटुंबीय किंवा जवळचे व्यक्ती त्यांना भेटायला येत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी, नेहाचा पती नचिकेत, शिवानीचे वडील आणि हिनाची आई बिग बॉसच्या घरात आली होती. तर आगामी एपिसोड्समध्ये अभिजीत केळकरची मुलं, शिव ठाकरेची आई आणि बहीण स्पर्धकांना भेटण्यासाठी येणार आहेत.

बिग बॉसच्या घरात शिव आणि वीणा यांची चांगलीच मैत्री जमली आहे. अशातच शिवची आई वीणाला बहिण म्हणून हाक मारण्यास शिवला सांगते. वीणासोबतच हिना आणि नेहालासुद्धा बहिण मानण्याचा सल्ला शिवची आई देते. इतकंच नाही तर त्या येत्या रक्षाबंधनला त्यांच्याकडून राखी बांधून घेण्यासही शिवला सांगतात.

शिवची बहीणसुद्धा त्याला घरात टास्क खेळण्याविषयी सल्ले देते. ‘टास्कमध्ये तू वीणाची मदत करू नकोस. वीणा उत्तम स्पर्धक असल्याने ती स्वत: टास्क पूर्ण करू शकते. तू तुझ्या खेळीवर लक्ष केंद्रीत कर,’ असं वीणाची बहीण सांगते.

आणखी वाचा : नुकत्याच सुरू झालेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची टीआरपी शर्यतीत बाजी

बिग बॉसच्या घरात शिव आणि वीणाची घनिष्ठ मैत्री आहे. वीणाने शिवसाठी असलेल्या भावनासुद्धा व्यक्त केल्या आहेत. तर शिवसुद्धा अप्रत्यक्षरित्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. इतकंच नव्हे तर महेश मांजरेकरसुद्धा दोघांना ‘लव्ह-बर्ड्स’ म्हणून चिडवताना दिसतात.