12 November 2019

News Flash

शिवानी ठरावी ‘बिग बॉस 2’ची विजेती, ‘या’ अभिनेत्यांची आहे तीव्र इच्छा

'बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी शिवानी अधिक पात्र स्पर्धक वाटते'

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. त्यामुळे या दुसऱ्या पर्वाचे विजेतेपद कोण पटकावणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांनी प्रवेश केल्यापासून त्यांचा चाहतावर्ग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकामध्ये चुरशीची लढत रंगताना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असतानाच कलाविश्वातील काही कलाकारांनीही या स्पर्धकांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये शिवानी सुर्वेला सर्वाधिक पाठिंबा मिळत असून तिच्यासह मालिकांमध्ये काम केलेल्या अनेक अभिनेत्यांची शिवानीच जिंकावी अशी इच्छा आहे.

‘देवयानी’, ‘एक दिवाना था’ , ‘जाना ना दिलसे दूर’ यासारख्या सुपरहिट ठरलेल्या मालिकांमध्ये शिवानीने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकांच्या सेटवर तिची प्रत्येक सहकलाकारासोबत चांगलीच गट्टी जमली होती. त्यामुळे या मालिकांमधील तिच्या को-स्टारची ती बिग बॉसचं विजेतेपद जिंकावं अशी इच्छा आहे. त्यामुळेच ‘देवयानी’ मालिकेतील संग्राम साळवी आणि ‘जाना ना दिलसे दूर’ आणि ‘एक दिवाना था’ या हिंदी मालिकेतला विक्रम सिंग चौहान या दोघांनीही शिवानीला जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“टॉप ६ सदस्यांपैकी बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी शिवानी अधिक पात्र स्पर्धक वाटते. ती ‘बिग बॉस सीजन २’ जिंकू शकेल असे मला वाटतं. त्यामुळे तिला भरभरून वोट करा. शिवानीला इतकी मतं द्या की ती यंदाचं पर्व जिंकेल, असं संग्राम म्हणाला.

मराठी मालिकांच्या जगतात अधिराज्य गाजवल्यावर शिवानी हिंदी मालिका विश्वामध्ये लोकप्रिय झाली. ‘जाना ना दिलसे दूर’ या हिंदी मालिकेत तिने ‘विविधा कश्यप’ची भूमिका साकारली होती. विविधा आणि अथर्व म्हणजेच शिवानी आणि विक्रम सिंग चौहान यांची जोडी प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली. विक्रम सिंग आणि शिवानी मालिकेनंतरही देखील छान मित्र आहेत. विक्रम सिंग चौहान म्हणतो, ”शिवानी सुर्वे खूप छान खेळत आहे. मला मराठी फारसं समजत नाही तरी ही मी शिवानीसाठी ‘बिग बॉस मराठी २’ चे काही भाग बघितले. माझी खूप इच्छा आहे की शिवानी सुर्वे हिच ‘बिग बॉस २’ ची विनर व्हावी.”

‘जाना ना दिलसे दूर’ नंतर शिवानी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर लोकप्रिय झाली. सध्या तिची ही मालिका इंडोनेशियामध्ये ‘सालेमानाचिंता’ नावाने दाखवली जात आहे. त्यामुळे शिवानीची लोकप्रियता जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली. शिवानीला सध्या हिंदी-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

First Published on August 31, 2019 2:54 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve co star fan ssj 93