छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. या घरामध्ये स्पर्धकांनी प्रवेश करुन दोन आठवडे झाले आहेत. त्यामुळे आता घरातील प्रत्येक सदस्याच्या स्वभावाचा अंदाज यायला लागला आहे. त्यातच घरामधील कोणते स्पर्धक स्ट्राँग आहेत, याविषयीचा अंदाज प्रेक्षकांना यायला लागला आहे. विशेष म्हणजे शिवानी सुर्वेकडे आज स्ट्राँग स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. देवयानी या कार्यक्रमातून नावारुपाली आलेल्या अभिनेत्री शिवानी सुर्वेने करिअरमध्ये तसंच आयुष्यामध्ये मोठा संघर्ष केल्याचं समोर आलं आहे.

शिवानी सुर्वेने बिग बॉसच्या घरात संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपली संघर्षकथा सांगितली. कधी काळी दोन वेळच्या जेवणासाठीही तिला संघर्ष करावा लागला होता. मात्र या साऱ्यावर मात करत तिने तिच्या आईचं स्वप्न पूर्ण केलं. समुद्रापासून १५ मिनीटांच्या अंतरावर एक घर विकत घेत तिने आईचं स्वप्न पूर्ण केल्याचं सांगितलं. मूळची चिपळूणची असलेल्या शिवानीचं संपूर्ण बालपण डोंबिवलीमध्ये गेलं.

कलाविश्वामध्ये पदार्पण करण्याविषयी शिवानी म्हणते, “अभिनय क्षेत्रामध्ये मी अपघातानेच आले. आई-वडिलांचे एक्सिबिशन शिवाजीमंदिर नाट्यगृहाच्या शेजारी होते. तिथे मनोहर नरे यांनी ओम नाट्यगंधच्या ‘मांगल्याचे लेणे’ नाटकात मला संधी दिली. या नाटकाच्यावेळी मी डोंबिवलीहून सगळीकडे प्रवास करायचे आणि एकदा एक अख्खी रात्र मला आजीसोबत प्लॅटफॉर्मवर काढावी लागली. त्यामुळे आईने ठरवलं आता मुंबईतच राहायला यायचं. म्हणून आम्ही सायनला राहायला यायचा निर्णय घेतला. पण त्यानंतर आमची आर्थिक स्थिती खूप खालावली,” असं शिवानीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “एक वेळ अशी आली होती, जेव्हा आमच्याकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे शिल्लक नव्हते. अनेक वेळा माझ्या बहिणीला पार्ले-जीच्या बिस्कीटांवर पूर्ण दिवस रहावं लागायचं. त्यातच वाण्याकडून सामान आणताना अपुऱ्या पैशांअभावी दहा रुपयांची डाळ, दहा रुपयांचे तांदूळ आणि दहा रुपयांचं तेल आणावं लागायचं. हे सारं सामान आणण्यासाठीदेखील आम्हाला कशीबशी तजवीज करावी लागत असे. त्याचवेळी मी ठरवलं, की घरातल्यांसाठी काही तरी करायचं आणि आज मला अभिमान आहे की वयाच्या १६ व्या वर्षीच मी पहिली गाडी घेतली. आणि १७ व्या वर्षी आईचे समुद्रापासून 15 मिनीटांवर स्वत:चं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण केले”.