हिंदी ‘बिग बॉस’चे मराठी रुपांतर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिला पर्वाला सुरुवात झाल्यापासून हा शो चांगलचं रंगतदार वळण घेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत काही नव्या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. मात्र घरातील तिखट मिरची अर्थात मेघा धाडेने आपला खेळ उत्तमरित्या खेळत घरात स्वत:च स्थान अद्यापही टिकून ठेवलं आहे.

या शोमध्ये मैत्रीपेक्षा जिंकण्याला महत्व देणारी मेघा आपल्या तिखट बोलण्यामुळे चांगलीच चर्चेत असते. रोज काही ना काही कारणांमुळे मेघा चर्चेचा विषय ठरत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात क्वचितच असे स्पर्धक असतील ज्यांच्याबरोबर मेघाचा वाद झालेला नाही. मेघाच्या आयुष्यातील अशाच काही गोष्टी तिच्या चाहत्यांना माहित नाहीत. मात्र तिच्याबद्दलच्या या गोष्टी वाचून ख-या आयुष्यातील मेघा समजायला नक्कीच मदत होईल..

१. मेघा तिच्या रोखठोक बोलण्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात चर्तेत असते. प्रत्यक्ष आयुष्यातही मेघा याच स्पष्टोवक्तीपणामुळे ओळखली जाते. मेघाने कमी वयामध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

२. ‘कसोटी जिंदगी की’ या गाजलेल्या हिंदी मालिकेमध्ये ती झळकली होती. या मालिकेनंतर ती घराघरात पोहोचली. या मालिकेप्रमाणेच ती अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये झळकली. त्यानंतर तिने काही चित्रपटांची निर्मितीही केली. मात्र यात तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

३. मेघाला अभिनयाबरोबरच स्वयंपाक करणे आणि गाणी म्हणण्याची विशेष आवड असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दिसून येत आहे. अनेक वेळा ती ‘बिग बॉस’च्या घरात स्वयंपाक घरात काम करताना गाणी गुणगुणताना दिसून येते.

४. ‘बिग बॉस’मधून ‘कम बॅक’ करणारी मेघा गेल्या काही काळापासून मराठी चित्रपटसृष्टीपासून लांब होती. काही वैयक्तिक करणामुळे मेघाला चित्रपटसृष्टीपासून फारकत घ्यावी लागल्याचे तिने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितले.

५. मेघा लग्नाअगोदरच गरोदर राहिल्यामुळे याबाबत विशेष चर्चा रंगली होती. मात्र लहान वयात आई झाल्यामुळे मेघाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. परंतु या परिस्थितीतही न खचता तिने स्वत: च करिअर घडविले. दरम्यान, मेघाने पुन्हा लग्न केले असून तिचे पती नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये व्हाईस प्रेसिडेण्ट आहेत.

ख-या आयुष्यात मेघाने जरी अनेक समस्यांना तोंड दिले असले. तरी ती कणखर असल्याचे ‘बिग बॉस’च्या घरात दाखवून देत आहे. या घरात सध्या प्रत्येक स्पर्धक खेळ जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत असून मेघा खेळामध्ये मैत्री आणत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चा किताब जिंकण्यासाठी मेघा ख-या अर्थाने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.