वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय ठरलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं मराठी पर्व अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. येत्या रविवारी म्हणजेच २२ जुलै रोजी ग्रँड फिनाले पार पडणार आहे. सहा स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत आणि आता सहा जणांपैकी ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. मेघा धाडे, पुष्कर जोग, सई लोकूर, आस्ताद काळे, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत या सहा जणांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
बिग बॉस मराठीच्या विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जाणारी रेशम टिपणीस घरातून बाहेर पडली. तिच्यानंतर आणखी एक सदस्य घराबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सहा जण अंतिम फेरीपर्यंत ठेवण्याची घोषणा करत बिग बॉसने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
पुष्कर जोग हा बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वांत लोकप्रिय स्पर्धक आहे असं म्हणायला हरकत नाही. पुष्करचं आजवर घरातील एकंदर वागणं पाहता तो नेहमीच प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकांच्या यादीत राहिला आहे. तर दुसरीकडे आस्ताद काळेचं गूढ वागणं प्रेक्षकांना पेचात पाडणारं आहे. त्याचा गर्विष्ठपणा आणि इतर मुद्दे पाहता त्याची जिंकण्याची शक्यता इतर स्पर्धकांच्या तुलनेत कमीच आहे.
प्रवास होता खडतर परंतू ज्याने पार केला बेहत्तर, नाव त्याचंच होणार जगभर… पाहायला विसरू नका, #BiggBossMarathi Finale 22 जुलै संध्या. 7 वा. फक्त #ColorsMarathi वर.@AastadKale @SmitaGondkar @meghadhade @jogpushkar #SaiLokur #SharmishthaRaut pic.twitter.com/pfsMOCD9zT
— Colors Marathi (@ColorsMarathi) July 19, 2018
वाचा : मिलिंद-अंकिता सोमण दिसणार ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात?
बिग बॉस मराठीत सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेली आणि लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे मेघा धाडे. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी मेघाची फार अशी ओळख नव्हतीच. बिग बॉसमुळे ती घराघरांत पोहोचली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. घरातील तिचं वागणं, तिचं व्यक्तिमत्त्व याची दाद प्रेक्षक देत असून सोशल मीडियावरही तिचा चाहता वर्ग वाढला आहे. त्यामुळे मेघा विजेतीपदाची प्रमुख दावेदार मानली जात आहे.
सई लोकूर, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा राऊत या तिघींपैकी सई सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक ठरली आहे. सईचा घरातील वावर आणि तिची खेळी यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. तर दुसरीकडे स्मिता अंतिम फेरीपर्यंत पोहोचणार याची शक्यता फार कमी होती. शर्मिष्ठा वादांपासून दूर राहत नेहमीच घरात लोकप्रिय ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिली. त्यामुळे आता या तिघांमध्येही चढाओढ आहे.
मेघा, पुष्कर, सई, आस्ताद, स्मिता, सई आणि शर्मिष्ठा या सहा जणांपैकी कोण विजेता ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 19, 2018 12:19 pm