20 June 2019

News Flash

‘बिग बॉस मराठी २चं ग्रँड प्रिमिअर; या सेलिब्रिटींचा घरात प्रवेश

बिग बॉस मराठी २ च्या घरात कोण कोण असणार याची गेल्या काही दिवसांपासून लागलेली उत्सुकता आता संपली आहे.

बिग बॉस मराठी २ च्या घरात कोण कोण असणार याची गेल्या काही दिवसांपासून लागलेली उत्सुकता आज संपली आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमिअर नुकताच पार पडला असून बिग बॉसच्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी जाणार यावरून पडदा उचलण्यात आला आहे. मराठी कलाविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच गाजणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. वादग्रस्त पण तेवढाच लोकप्रिय ठरलेल्या या शोचं सूत्रसंचालन यावेळीदेखील महेश मांजरेकर करणार आहेत

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे विज बिग बॉसची घरातील पहिली स्पर्धक ठरली. किशोरी शहाणेला ७वा क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेचा दुसरा स्पर्धक मालवाणचे नायक दिगंबर नाईक आणि तिसरी स्पर्धक नेहा शितोळे ठरली आहे. दिगंबर नाईक यांनी स्टेजवर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मिमिक्री करून दाखवली तर अभिनेत्री नेहा शितोळेने कविता सादर केली आहे. दिगंबर नाईकने घरात एन्ट्री घेण्यापूर्वी गाऱ्हाणे घातल्यामुळे तेथेच स्पर्धेला सुरूवात झाली आहे.

नेहा शितोळेनंतर कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकले यांनी घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेनं ‘पिंगा गं पोरी पिंगा’ हे गाणं गात जबरदस्त एण्ट्री केली. त्यानंतर ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेची अभिनेत्री वीणा जगतापनं ही बिग बॉसच्या घरात पोहोचली. या मालिकेच्या शीर्षकगीतावर तिने परफॉर्म केलं.

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासूनच राजकारण सुरू झाल्याचे दिसून आले. सुरूवातीला दिगंबर नाईकने घातलेल्या गाऱ्हाण्यानंतर माझ्या मुलीची मला प्रचंड आठवण येईल असे म्हणत वैशालीनं सर्वांना भावूक केलं. तर अभिजीतच्या बडबडीपासून सुटका केल्याचे सांगत एन्ट्रीबद्दल नेहाने वीणाचे आभार मानले.

‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वेनं हटके अंदाजामध्ये एन्ट्री केली. यावेळी तिने ‘ही पोली साजूक तुपातली’वर नृत्य सादर केलं. शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले जबरदस्त परफॉर्मन्स देत बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला.

First Published on May 26, 2019 9:31 pm

Web Title: bigg boss marathi season 2 grand premier watch contestants list