सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस’. वादग्रस्त पण तितकाच गाजणारा हा शो गेल्या वर्षी मराठीत आला. महेश मांजरेकर यांनी सूत्रसंचालक केलेल्या या कार्यक्रमाला राज्यभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल. तेव्हाच ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची चर्चा रंगली होती. अखेर दुसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाची झलक ट्विटरद्वारे शेअर करण्यात आली आहे. ‘तो परत येतोय’ म्हणत या कार्यक्रमाचा नवीन लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. महेश मांजरेकर असतील की दुसरा कोणता चेहरा असेल हे येत्या काळत स्पष्ट होईलच. त्याचप्रमाणे यामध्ये स्पर्धक कोण असतील याचीही उत्सुकता आहे.

पहिल्या पर्वात उषा नाडकर्णी, जुई गडकरी, सुशांत शेलार, विनीत बोंडे, भूषण कडू, अनिल थत्ते, सई लोकूर, आस्ताद काळे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, मेघा धाडे यांसारख्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. तर अभिनेत्री मेघा धाडे या पर्वाची विजेती ठरली होती.