बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मैत्री, प्रेम, राग, रुसवे-फुगवे हे सारं काही पाहायला मिळतं. त्यामुळेच हा शो प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. बिग बॉस मराठीचं २ पर्व सुरु होऊन आता एक महिना झालं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी हिना पांचाळ या स्पर्धकाची घरात एण्ट्री झाली. हिना घरात आल्यापासून तिचे अनेकांसोबत वाद झाले आहेत. त्यामुळे कमी कालावधीमध्ये ती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच आता घरामध्ये शिवने तिची माफी मागितल्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा सुरु झाली आहे.

घरामध्ये शिव आणि वीणाची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र हिनाच्या येण्यामुळे या दोघांच्या मैत्रीमध्ये अनेक वाद होतांना पाहायला मिळत आहे. आतादेखील तसंच काहीसं झालं आहे. मात्र वीणाची समजूत काढण्याच्या नादात शिवने हिनाला दुखावलं आहे.

शिवने हिनासोबत ‘खुदा जाने’आणि ‘पहेला पहेला प्यार है’ या गाण्यावर डान्स करत होता. त्यांना डान्स करताना पाहून ही माहिती रुपालीने वीणाला दिली. रुपालीने सांगितल्यानंतर वीणा या दोघांचा डान्स पाहायला बाहेर आली. परंतु वीणाला पाहताच शिवने हिनासोबत डान्स करण्यास नकार दिला. शिवने डान्स करण्यास नकार दिल्यामुळे ‘आता डान्स केला नाहीस, तर मी तुझ्यासोबत पुन्हा कधीच डान्स करणार नाही’,असं हिनाने शिवला सांगितलं. मात्र या प्रकारामुळे हिना दुखावली गेली. त्यामुळे शिवने हिनाची माफी मागितली. तर दुसरीकडे वीणादेखील शिववर नाराज झाली. त्यामुळे आता या तिघांमध्ये झालेल्या वादाचं पुढे काय होणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे.