‘बिग बॉस’च्या घरात असा एकही दिवस नाही जेव्हा भांडणं होत नाहीत. शोमधील स्पर्धक शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यात तर पहिल्या दिवसांपासून भांडणं सुरू आहेत. शिल्पा जाणीवपूर्वक विकाससोबत भांडायला जाते. गेल्या काही दिवसांमध्ये शिल्पा सतत कॅमेऱ्यासमोर येऊन विकासला त्रास देताना दिसते. तिच्या या सततच्या त्रासाला कंटाळून विकासने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

त्याचे झाले असे की, विकास, सपना हे गप्पा मारत बसले होते. तेव्हा नेहमीप्रमाणे शिल्पा तिथे आली आणि विकासला त्रास द्यायला लागली. तिच्या त्रासाला कंटाळून तो किचनमध्ये जातो आणि तिथले दोन अंडी तो जमीनिवर फेकून देतो. आतापर्यंत हिनाने विकासला अनेकवेळा सहकार्य केल्याचे दिसते पण यावेळी हिना विकासला त्याने केलेल्या वागणुकीबद्दल ओरडताना दिसते.

दुसऱ्यांच्या भांडणात तुम्ही आमच्या वाटणीची अंडी का फोडता असा प्रतिप्रश्न ती त्याला करते. हिनाने विकासला हा प्रश्न विचारल्यामुळे विकास आणि हिनामध्ये वादाला नवे तोंड फुटते. या सगळ्या वातावरणात विकासला ‘बिग बॉस’च्या घरातून निघून जावेसे वाटते.

नेमका याचवेळी ‘बिग बॉस’च्या टीमकडून घराचा एक दरवाजा उघडा राहतो. विकासला तो दिसतो आणि तो त्या दारातून बाहेर पडत पळून जातो. रिपोर्टनुसार विकासला परत बिग बॉसच्या घरात धाडण्यात येते. या त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्याला घरातील तुरुंगातही डांबण्यात येऊ शकते.