अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता इमरान हाशमी हे उत्तर बिहारमधील एका लहानशच्या शहरातील रहिवाशी आहेत. तसेच त्यांना एक २० वर्षाचा मुलगा आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही नक्कीच त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. मात्र खरोखरच असा दावा करणारं एक ओळखपत्र समोर आलं आहे.

मुज्जफरापूरमधील एका कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील भीमराव आंबेडकर बिहार विद्यापिठातील अधिकाऱ्यांनी जेव्हा बीएच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या ओळखपत्राचे फोटो पाहिले तेव्हा तेही चक्रावले. कुंदर कुमार या धनराज महतो डिग्री कॉलेजच्या विद्यार्थ्याचे हे आयकार्ड आहे. हे कॉलेज मुज्जफरापूरमधील मिनापूर येथे असून ते भीमराव आंबेडकर विद्यापिठाशी संलग्न आहे.

कुंदरच्या ओळखपत्रावर वडीलांचे नाव इमरान हाशमी असल्याचं लिहिलेलं आहे. तर आईच्या नावाच्या जागी सनी लिओनी असं लिहिलेलं आहे. या मुलाच्या पालकांची ही नावं असू शकत नाही असं येथील अधिकाऱ्यांचं मत आहे. जरी असली तरी हा योगायोग असावा असं म्हणता येईल. मात्र एकाच घरातील तीन व्यक्तींची तीन वेगळी अडनावं कशी असू शकतील अशी चर्चाही या आयकार्डवरुन रंगलीय. त्यामुळे हे आयकार्ड म्हणजे एखाद्याने केलेली मस्करी असावी किंवा बेजबाबदारपणामुळे घडलेला प्रकार असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बरं हा योगायोग कमी म्हणून की काय या ओळखपत्रावरील घराचा पत्ता म्हणून ज्या चुर्तूभूज स्थान परिसराचं नाव लिहिलं आहे तो परिसर रेड लाइट एरिया म्हणून कुप्रसिद्ध आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आधेश दिले आहेत. ही एखाद्याने केलेली मस्करी असू शकते ज्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असू शकतो. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सादर करण्यात येणाऱ्या अहवालाच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती विद्यापिठाचे कुलसचिव राम कृष्ण ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, या ओळखपत्राचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायलर झालेत. तसेच अनेक वेबसाईटने यासंदर्भात बातम्याही केल्या आहेत. अशाच एका बातमीवर अभिनेता इमरान हाशमीने मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. इमरानने या बातमीचे ट्विट रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया देताना, “शपथ घेऊन सांगतो हा माझा (मुलगा) नाही” असं म्हटलं आहे.

याप्रकरणाशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता आधारकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्रावरील इतर माहितीच्या आधारे या विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.