१० एप्रिल १९१२ रोजी इंग्लंडच्या साऊ थ हॅम्प्टन बंदरातून अमेरिकेच्या स्वप्नभूमीकडे पहिल्या प्रवासाला निघालेली ‘टायटॅनिक’ ही महाकाय, आलिशान बोट प्रस्थानानंतर अवघ्या सहाव्या दिवशीच १५ एप्रिलला अ‍ॅटलान्टिक महासागरात एका हिमनगावर आदळून सागरतळी विसावली. या दुर्दैवी अपघातात त्यावरील दीड हजारांवर प्रवाशी तसेच नाविक मरण पावले. जगातील सर्वाधिक गाजलेली बोट दुर्घटना म्हणून टायटॅनिकच्या या शोकांतिकेचा उल्लेख केला जातो.  १९९७ साली याच घटनेवरून तयार करण्यात आलेल्या दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाने दहा ऑस्कर पुरस्कारांवर आपले नाव कोरत अमाप प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवली होती. हा चित्रपट विशेष लोकप्रिय ठरला तो ‘जॅक’ आणि ‘रोझ’ यांच्या प्रेमकथेमुळे. ‘कधीही न बुडणारे जहाज’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या टायटॅनिकला अपघात होतो आणि अपघातात ‘रोझ’ला वाचवण्याच्या प्रयत्नात ‘जॅक’चा मृत्यू होतो. या चित्रपटाला २० वर्षे लोटून गेली परंतु आजही अनेक चाहते या हृदयस्पर्शी शेवटाबद्दल आपली नाराजी व्यक्त करतात. दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्यासहित चित्रपटात काम केलेल्या लिओनार्दो दी कॅप्रिओ, केट विन्सलेट, बिल पेक्सटन यांच्यापैकी प्रत्येक कलाकाराच्या मुलाखतीत किमान एक प्रश्न ‘टायटॅनिक’मधील जॅकच्या निधनाबद्दल विचारला जातो. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा बिली जेन याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घडला आहे. बिली जेन याने चित्रपटात खलनायकाची भूमिका स्वीकारली होती. त्याने साकारलेल्या केल्डन हॉकली या व्यक्तिरेखेबद्दल आजही चाहत्यांच्या मनात असलेली नाराजी वेळोवेळी समाजमाध्यमांवर पाहायला मिळते. मुलाखतीत बिली जेनला रोझ आणि जॅकमधील प्रेमसंबंध माहीत असतानाही त्याने रोझला लग्नासाठी जबरदस्ती का केली? तसेच अपघातानंतरही जॅकला जिवंत ठेवता आले नसते का? असे प्रश्न विचारण्यात आले. यावर बिली काही क्षण हसला आणि त्याने ‘नाही’ असे ठाम उत्तर दिले. कारण ‘टायटॅनिक’ हा प्रेमपट नसून एका महाकाय जहाजाला झालेल्या भीषण अपघातावर आधारित चित्रपट होता. चित्रपटाची पटकथाच अशाप्रकारे तयार केली गेली की ज्यात जॅकचा मृत्यू हा अटळ होता. तसेच जेम्स कॅमरुन यांना चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये चालावा असे अपेक्षित होते. आणि त्यासाठी चित्रपट ज्या व्यक्तिरेखेभोवती त्याने भूतकाळात रमणे गरजेचे ठरते. तसेच जुन्या आठवणीत रमण्यासाठी पहिले प्रेम हे एक उत्तम माध्यम असू शकते. त्यामुळे लेखकाने पटकथा पुढे नेण्यासाठी प्रेम या संकल्पनेचा वापर केला. चित्रपटात जॅकचा मृत्यू होतो. म्हणूनच रोझ जॅकला आठवण्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जाते. परिणामी त्या जुन्या आठवणींच्या माध्यमातून आपल्याला टायटॅनिक जहाजाचा प्रवास पाहता येतो. आता चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यात नायक व नायिकेला जिवंत ठेवूनही इतर प्रेमपटांप्रमाणे चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये नेता आला असता परंतु त्यामुळे कथेतील तीव्रता नाहीशी झाली असती, असे बिली जेनला वाटते.