मराठीत चित्रपटांमध्ये सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. या प्रयोगांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मराठीतच नव्हे तर कदाचित अन्य भारतीय भाषा किंवा बॉलीवूडमध्येही झाला नाही असा एक वेगळा प्रयोग ‘बायोस्कोप’च्या निमित्ताने येत्या १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चार दिग्दर्शक, चार संगीतकार आणि चार कवितांवरील (यात एक शेर आहे) चार लघुचित्रपट असे याचे स्वरूप आहे. मराठीत यापूर्वी कथा, कादंबरी, नाटक आदी साहित्य प्रकारावर आधारित चित्रपट येऊन गेले आहेत. पण, कविता घेऊन त्या कवितांवर पटकथा लिहून चित्रपट सादर करण्याचा हा आगळावेगळा प्रयोग आहे.
‘गोल्डन ट्री लिमिटेड’ निर्मिती संस्था आणि मराठीतील विजू माने, गजेंद्र अहिरे, गिरीश मोहिते, रवी जाधव या चार दिग्दर्शकांनी एकत्र येऊन ‘बायोस्कोप’चा खेळ मांडला आहे. याबाबत ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना विजू माने म्हणाले, ‘माझा चित्रपट कवी सौमित्र यांच्या ‘एका पावसाळी दुपारी’या कवितेवर आधारित असून चित्रपटाचे नाव ‘एक होता काऊ’ असे आहे. आपल्याकडे गोरा रंग हा चांगला मानला जातो. काळ्या रंगाच्या माणसांकडे थोडे तुच्छतेने पाहिले जाते. अशा माणसांना आपल्या रंगामुळे न्यूनगंडही आलेला असतो. माणसांच्या बाह्य़ रूपाच्या रंगावरून त्याची परीक्षा करण्यापेक्षा तो मनाने कसा आहे हे सगळ्यात महत्त्वाचे असते. हीच गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर गजेंद्र अहिरे यांनी सांगितले, ‘माझा लघुचित्रपट मिर्झा गालिब यांच्या ‘दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है’ या शेरवर आधारित आहे. गालिब यांनी उपस्थित केलेला हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडणारा आहे. या प्रश्नाचे प्रत्येकाचे उत्तरही आपापल्या परीने वेगवेगळे असू शकते नव्हे ते असतेच. गालिब यांचा हा शेर मला ज्याप्रकारे भावला, तो ऐकल्यानंतर माझ्या मनात जो काही विचारांचा, भावनांचा कल्लोळ उठला त्याचे प्रकटीकरण मी माझ्या पद्धतीने या लघुचित्रपटात केले आहे. चार व्यक्तिरेखा चित्रपटात असून आयुष्याच्या एका संध्याकाळी ही मंडळी आपल्या जीवनाचा हिशोब ते मांडताहेत. आयुष्यात निर्माण झालेले प्रश्न व त्यावर त्यांनी शोधलेली उत्तरे असे या चित्रपटाचे थोडक्यात सार आहे. चित्रपटाचे नावही ‘दिले नादान’ असेच ठेवले आहे.
दिग्दर्शक गिरीश मोहिते यांचा चित्रपट लोकनाथ यशवंत यांच्या ‘बैल’ या कवितेवर आहे. आपल्या चित्रपटाबाबत बोलताना मोहिते म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याची आज कुचंबणा होत आहे. तो तळागाळातच राहिला असून त्याचे शोषण होत आहे. आज शेतकरी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या करत आहेत. आमचा चित्रपट शेतक ऱ्यांनो आत्महत्या करू नका हे सांगतो. ‘बायोस्कोप’ हा केवळ चित्रपट नाहीये तर ती एक चळवळ असून चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी आपल्या भावना/ अभिव्यक्ती आपापल्या पद्धतीने सादर केली आहे. मराठीतील हा एक वेगळा प्रयोग ठरेल, असा विश्वास मराठी चित्रपटसृष्टीत व्यक्त होतो आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांचा चित्रपट कृष्णधवल रंगातील आहे. कवी संदीप खरे यांची ‘उदासित या कोणता रंग आहे’ ही कविता आणि नाटककार विजय तेंडुलकर यांची ‘मित्रा’ ही कथा यांची एकत्रित सांगड या चित्रपटात घालण्यात आली आहे. चित्रपटाचे नाव ‘मित्रा असे आहे. या चित्रपटाद्वारे कवी संदीप खरे अभिनेता म्हणून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. समलिंगी व्यक्तींचे भावविश्व, त्यांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि घुसमट यातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या चारही चित्रपटांत नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर, मृण्मयी देशपांडे, वीणा जामकर, मंगेश देसाई, स्मिता तांबे, कुशल बद्रिके, स्पृहा जोशी हे मुख्य कलाकार आहेत. अविनाश-विश्वजीत, डॉ. सलील कुलकर्णी, नरेंद्र भिडे, सोहम पाठक या चार संगीतकारांनी ‘बायोस्कोप’मधील चार वेगवेगळ्या चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यामुळे रसिकांना चार वेगवेगळ्या शैलीतील गाणीही ऐकायला मिळणार आहेत. असा हा वेगळा ‘बायोस्कोप’ १७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
गुलजार दुवा..
हिंदीतील सदाबहार व संवेदनशील ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांचा आवाज ‘बायोस्कोप’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा ऐकता येणार आहे. चार लघुचित्रपट असलेल्या ‘बायोस्कोप’मध्ये एक चित्रपट संपून दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वी चित्रपटाला जोडणारे सूत्र म्हणून गुलजार यांच्या आवाजाचा उपयोग करण्यात आला आहे. ‘बायोस्कोप’मधील प्रत्येक चित्रपट अध्र्या तासांचा असून या चित्रपटाच्या मधला दुवा सांधण्याचे काम गुलजार यांनी केले आहे. तीन कवींच्या कवितांचा गुलजार यांनी हिंदीत केलेला भावानुवाद आणि त्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले मनोगत प्रेक्षकांना ऐकता येणार आहे. गुलजार यांच्यासारख्या सहृदयी व संवेदनशील कवीने तितक्याच सहजपणे अन्य कवींच्या कवितांना दिलेली दाद आणि त्यावरील स्वत:ची भावानुव्यक्ती हे ‘बायोस्कोप’चे खास वैशिष्टय़ असल्याचे दिग्दर्शक विजू माने यांनी सांगितले.