चरित्रपट हा बॉलीवूडजनांसाठी व्यवसायाच्या दृष्टीने तसा फायदेशीर राहिलेला प्रकार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चरित्रपटांनी बॉलीवूडमध्ये जी कमाई केली ती पाहता त्यांच्या निर्मितीत सातत्य राहणार यात शंका नाही. तुलनेने २०१६ मध्ये जवळपास सगळ्याच चरित्रपटांनी चांगली कमाई केल्यानंतरही गेल्या वर्षी चरित्रपटांची एवढी गर्दी झाली नव्हती, मात्र यंदा ही लाट परत आली आहे. आणि गंमत म्हणजे खेळापासून गणितज्ञापर्यंत अनेक गाजलेल्या व्यक्तिरेखांची चरित्रकथा रूपेरी पडद्यावर झळकणार आहे आणि एकच कलाकार तीन-तीन चरित्रपटांमधून दिसणार आहे. चरित्रपटांच्या या लाटेचा शुभारंभ अर्थातच वर्षांच्या पहिल्याच महिन्यात २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पॅडमॅन’ चित्रपटापासून होणार आहे.

‘पॅडमॅन’ हा अक्षयकुमारचा आणि पर्यायाने बॉलीवूडचा या वर्षीचा शुभारंभाचा चरित्रपट आहे. ज्यात अक्षयने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांची भूमिका केली आहे. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती खुद्द अक्षयच्या पत्नीने ट्विंकलने केली आहे. ट्विंकलच्याच या संदर्भातील लिखाणातून चित्रपटाची कल्पना पुढे आली असल्याचे बोलले जाते. अरुणाचलम यांची भूमिका साकारणे अक्षयसाठी एका अर्थाने आव्हान आहे. कारण सॅनिटरी नॅपकिन बनवण्यासाठी अरुणाचलम यांनी जे काही अचाट प्रयोग केलेत ते खरं म्हणजे कोणा येरागबाळ्याचं काम नव्हे. त्यात बाल्कीचा चित्रपट असल्याने वास्तववादी चित्रणाचा अंक यात जास्त असणारच. अक्षयबरोबर यात राधिका आपटे आणि सोनम कपूर अशा दोन खंद्या अभिनेत्री आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहेच. ‘पॅडमॅन’बरोबर प्रदर्शित होणारा ‘पद्मावती’ हाही खरं तर चरित्रपटच म्हणायला हवा, मात्र सध्या चित्रपटावरून निर्माण झालेला वाद, ‘पद्मावत’ या कवितेवर बेतलेला चित्रपट यामुळे ऐतिहासिक चित्रपट म्हणून त्याची नोंद जास्त घेतली जाईल.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

चरित्रपटांच्या बाबतीत एका कलाकाराने एखादी व्यक्तिरेखा उत्तम वठवली की त्याच्याकडे तशा चरित्रपटांची एकच रीघ लागते. कंगना राणावत, विद्या बालन ही अभिनेत्रींमधली या बाबतीतली आघाडीची नावं आहेत. तर रणवीर सिंगने याआधी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून बाजीरावची व्यक्तिरेखा साकारली होती. आता ‘पद्मावती’तून तो अल्लादीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय, या वर्षी त्याचा बहुचर्चित चित्रपट असेल तो म्हणजे कबीर खान दिग्दर्शित ‘८३’. रणवीर सिंग यात क्रिकेटचा ‘देव’ कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असला तरी हा त्यांचा चरित्रपट नाही. पहिल्या विश्वचषक विजयाची कथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरणार आहे. यानिमित्ताने, क्रि केटचा खेळ गाजवणारे त्या काळातील अनेक खेळाडू रूपेरी पडद्यावर पाहता येणार आहेत. चरित्रपटांच्या या गर्दीत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे अक्षयकुमार. अक्षयकुमारकडे सध्या एक नव्हे तीन चरित्रपट आहेत आणि तिन्ही चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहेत. ‘पॅडमॅन’नंतर अक्षयचा ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयकुमार हॉकीपटू बलबीर सिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. बलबीर सिंग आणि त्यांच्या टीमने भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या खेळात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ती यशस्वी गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर-रितेश सिधवानी जोडीच्या ‘एक्सेल एन्टरटेन्मेट’ची असून दिग्दर्शन ‘तलाश’ फेम रीमा कागती यांचं आहे. अक्षयकुमार या चित्रपटात एका वेगळ्याच रूपात दिसणार असल्याचे बोलले जाते. याशिवाय, ‘टी सीरिज’ कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांच्यावर आधारित ‘मोगल’ चित्रपटात अक्षयच गुलशन कुमार यांचीच भूमिका साकारताना दिसणार आहे. भारतीय संगीत उद्योगाचा चेहरा बदलणाऱ्या गुलशन कुमार यांची १९९७ साली गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘जॉली एल.एल.बी.’ फेम सुभाष कपूर यांचं असणार आहे. अक्षयकुमारसाठी त्यांचा ‘जॉली एल.एल.बी. २’ विक्रमी कमाई करणारा ठरला होता. त्यामुळे दिग्दर्शक-अभिनेत्याची ही जोडगोळी ‘मोगल’मधून एकत्र दिसणार आहे.

चरित्रपटांचा सिलसिला कंगना राणावतच्या बाबतीतही पुढे सुरू आहे. गेल्या वर्षी कंगना हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिमरन’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात जुगार खेळण्याचं व्यसन लागलेल्या कॅनडातील एका भारतीय तरुणीची वास्तव कथा दाखवण्यात आली होती. कंगनाने ही मुख्य भूमिका साकारली होती, मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर चांगलाच आपटला. गेलं वर्ष त्या अर्थाने कंगनासाठी वाईट गेलं असलं तरी या वर्षीची सुरुवात मात्र तिच्या दणकेबाज चरित्रपटाने होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका कंगनाने वठवली असून ‘मनकर्णिका’ हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी ‘मनकर्णिका’ची कथा लिहिली आहे. कंगनासाठी कारकीर्दीच्या दृष्टीने हे वर्ष आणि तिचा पहिला चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे. गेलं वर्ष ‘जग्गा जासूस’ वगळता मोठं अपयश पाहिलेल्या रणबीर कपूरने या वर्षी चरित्रपटांमधून काम केलं आहे. बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्यावर आधारित राजकुमार हिरानी दिग्दर्शित चित्रपट हा रणबीरचा महत्त्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी लुकपासून अभिनयापर्यंत सर्वच स्तरांवर रणबीरने मेहनत घेतली आहे. गेले वर्षभर या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेला रणबीर आता कुठे आपल्या नव्या चित्रपटाकडे वळला आहे. संजय दत्तवरचा त्याचा हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाद अली दिग्दर्शित ‘सुरमा’ हा हॉकीपटू संदीप सिंग याची कथा सांगणारा चरित्रपटही २९ जूनलाच प्रदर्शित होणार आहे. यात पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसेन संदीप सिंगची भूमिका साकारणार आहे. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार असलेल्या संदीप सिंगला अर्धागवायूमुळे दोन वर्ष व्हीलचेअरवर काढावी लागली होती. मात्र त्यातून बाहेर पडून ते पुन्हा टीममध्ये परतले आणि त्यांनी खेळाची सूत्रं हातात घेतली. ही संघर्षकथा या चित्रपटात दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता प्रभासबरोबर ‘साहो’ चित्रपटासाठी चर्चेत असलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर या वर्षी बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालच्या रूपात दिसणार आहे. गेल्या वर्षी तिने हसीना पारकरची भूमिका केली होती. मात्र सायनाची भूमिका तिच्यासाठी जास्त आव्हानात्मक ठरणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे. एरवी ग्लॅमरस आणि अ‍ॅक्शनपॅड भूमिकांमधूनच खेळणारा हृतिक रोशनही या वेळी चरित्रपटातून दिसणार आहे. गणितज्ञ आनंद कुमार यांची भूमिका हृतिक करणार आहे. गेल्या वर्षी ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर या वर्षी भारताचा ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. चरित्रपटांची ही यादी संपता संपणार नाही इतकी मोठी आहे. हे सगळेच चित्रपट वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तिरेखा आणि गोष्टी रूपेरी पडद्यावर आणणार असल्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता असणं साहजिक आहे. आता ही उत्सुकता तिकीटबारीवर किती परावर्तित होते, याची झलक त्यांच्या पहिल्या अंकापासून म्हणजेच ‘पॅडमॅन’पासूनच दिसेल.