तामिळनाडूच्या दिवगंत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची लोकप्रियता साऱ्यांनाच ठाऊक आहे. ५ डिसेंबर २०१६ साली जगाचा निरोप घेणाऱ्या जयललिता यांनी सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धूरा सांभाळली होती. त्यामुळे सुलभरित्या राजकीय कारकिर्द सांभाळणाऱ्या जयललिता यांचा जीवन प्रवास लवकरच उलगडा जाणार आहे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय यांनी जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाची निर्मिती विब्री मीडिया प्रोडक्शनअंतर्गत करण्यात येणार आहे. लोकप्रिय राजकीय व्यक्तीमत्वांमध्ये जयललिता यांचं नाव कायमच अग्रस्थानी होतं. त्यांची हिच लोकप्रियता पाहून त्यांचा बायोपिक तयार करण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आहे.

२०१६ रोजी अखेरचा श्वास घेणाऱ्या जयललिता अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या. त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास बायोपिकच्या माध्यमातून मांडण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आहे. सध्या तरी या बायोपिकवर चर्चा सुरु असून या बायोपिकमध्ये कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही.