हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे अमरीश पुरी. अमरीश पूरी यांचा ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील ‘मोगॅम्बो खुश हुवा..’ हा संवाद वर्षांनुवर्ष लोकांच्या मनात गारुड करून आहे. आज या अभिनेत्याची जयंती आहे. अमरीश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी पंजाबमधील जलंधर येथे झाला होता. पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या अमरीश यांच्या वडिलांचे नाव लाला निहाल चंद पुरी आणि आईचे नाव वेद कौर असे आहे. आज अमरीश पुरी आपल्यात नसले तरी चित्रपटांच्या माध्यमातून कायम आपल्यासोबत आहेत. अमरीश पुरी यांच्यासोबत अनेक कलाकारांनी स्क्रीन शेअर केली आहे. यात अभिनेता आमिर खानच्या नावाचाही समावेश आहे. परंतु एका घटनेनंतर या दोघांनीही एकमेकांसोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दिवंगत अभिनेता अमरीश पुरी हे दोन्ही कलाकार बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी आहेत. मात्र ‘जबरदस्त’ या चित्रपटानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम करण्याचे कटाक्षाने टाळले.

१९८५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘जबरदस्त’ या चित्रपटातील एका सीनमुळे अमरीश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाले होते. या चित्रपटामध्ये अमरीश पुरी यांची मुख्य भूमिका होती. तर आमिर सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटातील एक सीन चित्रीत करत असताना अमरीश पुरी करत असलेले काम आमिरच्या पसंतीत पडत नव्हते. त्यामुळे याविषयी त्याने अमरीश यांना सांगितले. परंतु त्यानंतर या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. नंतर या दोघांनीही एकमेकांची माफी मागितली परंतु त्यानंतर हे दोघंही परत कधीच एकत्र दिसले नाहीत.

नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटातील एका सीनचे चित्रीकरण सुरु असताना आमिर अमरीश यांना काही सुचना करत होता. मात्र अमरीश यांनी आमिरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परंतु असे असताना सुद्धा आमिर त्यांना वारंवार सुचना करत होता. आमिरने लावलेला हा तगादा पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला आणि ते सर्वांसमोर आमिरच्या अंगावर जोरात ओरडले. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी आमिरची माफीही मागितली. मात्र त्यानंतर आमिरने त्यांच्यासोबत कधीच एकत्र काम केले नाही.