हिंदी चित्रपटसृष्टीत फिरोज खान त्यांच्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. मनमुरादपणे जीवन जगण्याच्या वृत्तीमुळे ते इतक कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळे ठरले. बॉलिवूडमध्ये ७०च्या दशकात सर्वात फॅशनेबल अभिनेते म्हणून फिरोज खान ओळखले जात होते. त्यावेळी त्यांची स्टाईल इतकी लोकप्रिय होती की अनेकजण त्यांना फॉलो करत होते. फिरोज खान यांची तुलना बऱ्याच वेळा हॉलिवूड अभिनेता क्लिंट ईस्टवुडसोबत केली जात असे. फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ मध्ये पठाण परिवारामध्ये झाला होता.

फिरोज खान आणि अभिनेते विनोद खन्ना यांची खूप छान मैत्री होती. या दोघांची जोडी त्यावेळची ‘जय- वीरु’ची जोडी मानली जात होती. त्यांनी ‘दयावान’, ‘कुर्बानी’ आणि ‘शंकी शंम्भू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. १९८० मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुर्बानी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाची निर्मीती, दिग्दर्शन आणि अभिनेत्याची भूमिका फिरोज खान यांनी साकारली होती. फिरोज खान यांच्या सोबत विनोद खन्ना यांनी स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटानंतर विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्यात चांगलीच गट्टी जमली होती.

फिरोज खान यांनी १९६५ मध्ये सुंदरीशी लग्न केले. पण त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. कारण फिरोज खान यांचे हवाई सुंदरी ज्योतिका धनराजगिरशी अफेअर होते. ज्योतिका, राजा महेंद्र धनराजगिर यांची मुलगी होती. फिरोज खान आणि ज्योतिका यांच्या रिलेशनच्या त्यावेळी फार चर्चा रंगल्या होत्या. फिरोज यांनी पत्नी सुंदरीला १९८५ मध्ये घटस्फोट दिला आणि ते ज्योतिकासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. ज्योतिकाला फिरोज यांच्याशी लग्न करायचे होते. मात्र फिरोज तिच्याशी लग्न करणे टाळत होते. अखेर ज्योतिकाने तिच्या आणि फिरोज यांच्या रिलेशनला पूर्णविराम लावला.

त्यानंतर फिरोज पुन्हा पत्नी सुंदरीकडे गेले. परंतु सुंदरी यांनी फिरोज यांचा स्विकार केला नाही. फिरोज खान यांना फरदीन खान आणि लैला ही दोन मुले आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेल्कम’ हा चित्रपट फिरोज यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला आहे. वयाच्या ६९ वर्षी २७ एप्रिल २००९ रोजी फिरोज यांनी जगाचा निरोप घेतला.