अभिनेते शशी कपूर यांनी नुकताच आपला ७७ वा वाढदिवस साजरा केला. आणि सोमवारी त्यांना चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान जाहीर झाल्याने त्यामुळे  वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला आहे. मात्र, हा पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त ऐकल्यानंतर खुद्द शशी कपूर यांनी आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चयरेद्गार काढले. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारे शशी कपूर हे कपूर कुटुंबातील तिसरी व्यक्ती ठरले आहेत. या आधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ राज कपूर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मोठे योगदान
शशी कपूर यांना हा सर्वोच्च बहुमान मिळण्यास उशीर झाला आहे असे मला अजिबात वाटत नाही. शशी कपूर हे द्रष्टे आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काळाच्या पुढे असणारे चित्रपट केले. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान निश्चितच मोठे आहे आणि त्यांना आज हा पुरस्कार मिळायलाच हवा होता, असे सांगत ऋषी कपूर यांनी आपल्या काकांचे अभिनंदन केले.
पुरस्काराचा आनंदच
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खरंच मला हा पुरस्कार मिळालाय का? अशी माझ्या वडिलांची आश्चर्यमिश्रित प्रतिक्रिया होती. बाबांना हा पुरस्कार जाहीर झाला याचा आनंदच आहे. पण ज्या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला त्याच दिवशी आमच्या पृथ्वी थिएटरसंदर्भात आयकर विभागाकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत याचा खेद वाटतो, असे शशी कपूर यांचे चिरंजीव कुणाल कपूर यांनी सांगितले.