बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे जॉनी लिवर. त्यांचे फक्त नाव जरी ऐकले तरी चेहऱ्यावर हास्य झळकल्याशिवाय राहत नाही. आज १४ ऑगस्ट रोजी जॉनी लिवर यांचा वाढदिवस. त्यांनी आजवर ३००हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या वाढदिवशी बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांच्या काही अप्रतिम व्हिडिओंवर एक नजर टाकूयात…

बाजीगर
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरूखचा ‘बाजीगर’ चित्रपट सर्वांनाच माहित असेल. या थरारपटातही प्रेक्षकांना जॉनी यांनी पोट धरून हसण्यास भाग पाडले. चहात साखरेऐवजी मीठ टाकण्याचे दृश्य असो किंवा प्रत्येक गोष्ट विसरण्याची सवय, या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली होती.

खिलाडी
अक्षय कुमारच्या गाजलेल्या ‘खिलाडी’ चित्रपटात जॉनी यांनी लॉजच्या केअरटेकरची भूमिका साकारली. गूढ, रहस्यमय असलेल्या या आणखी एका चित्रपटात जॉनी यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

लव्ह के लिए कुछ भी करेगा
या चित्रपटात जॉनी लिवरने ‘अस्लम भाई’ या स्थानिक गुंडाची भूमिका साकारली. मात्र सर्वांना हसवणारा हा गुंड होता असे म्हणावे लागेल.

कहो ना प्यार है
ऋतिक रोशनच्या ‘कहो ना प्यार है’मधला पोलीस तुम्हाला आठवतोय का? शौचालयाला जाण्यासाठी धडपडणाऱ्या जॉनी यांचे हावभाव आजही डोळ्यांसमोर आले की चेहऱ्यावर हास्य नक्कीच उमटते.

१९८४ साली जॉनी लिवर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विनोदी कलाकारांना फारशा महत्त्वाच्या भूमिका मिळत नाही असे अनेकदा म्हटले जाते. मात्र या कलेतही जॉनी लिवर यांनी आपली वेगळी छाप पाडत विनोदी क्षेत्रात सर्वोच्च स्थानी आपले नाव कोरले. परफेक्ट टायमिंग, चेहऱ्यावरील हावभाव, डायलॉग बोलण्याची पद्धत या सर्वांमुळे आज ते अनेक स्टँडअप कॉमेडीयन्ससाठी आदर्श विनोदी कलाकार आहेत.