प्रेक्षकांच्या बदलत्या दृष्टीकोनानुसार भारतीय चित्रपटांची संकल्पनाही बदलत आहे. स्टार आणि अभिनेता यांच्यामध्ये एक स्पष्ट सीमारेषा असून दोघांचाही स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. एकीकडे शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान, अक्षयकुमार या अभिनेत्यांकडे स्टार म्हणून पाहिलं जातं. तर दुसरीकडे विकी कौशल, आयुषमान खुराणा आणि राजकुमार राव यांच्याकडे अभिनेता म्हणून पाहिलं जातं. त्यातच राजकुमार रावसारखा अभिनेता इंडस्ट्रीत निश्चितपणे आपली एक वेगळी जागा निर्माण करताना दिसतोय. राजकुमारचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात…

३१ ऑगस्ट १९८४ रोजी गुरुग्रामच्या अहीरवाल येथे राजकुमार रावचा जन्म झाला. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून पदवी घेतल्यानंतर तो मुंबईला आला. लहानपणापासूनच बॉलिवूड अभिनेत्यांची नक्कल करायला त्याला खूप आवडायचं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी लहान-सहान काम केल्यानंतर एक दिवस त्याला दिवाकर बॅनर्जी यांच्या एका जाहिरातीकडे गेली. यामध्ये त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांना एक नवा चेहरा हवा होता. ही जाहिरात राजकुमार ऑडिशनसाठी गेला आणि त्याची निवड झाली. त्यानंतर त्याने ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहिल्यानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

अभिनयाप्रमाणेच राजकुमारचं वैयक्तिक आयुष्यदेखील तितकंच चर्चिलं गेलं. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातील राजकुमारची सहअभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘एफटीआयआय’मध्येच दोघांची पहिल्यांदा भेट झालेली आणि एका शॉर्ट फिल्मच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

आपल्या प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा आणणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार सध्या अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. काही दिवसापूर्वी त्याचा ‘स्त्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्क्रीन शेअर केली आहे.