अभिनयासोबत एक फिटनेस आयकॉन म्हणून अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे सुष्मिता सेन. १९९४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकणाऱ्या सुष्मिता सेनचा आज १९ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. सुष्मीताने १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दस्तक’ या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील ‘सिर्फ तुम’, ‘बीवी नंबर १’, ‘ऑंखे’, ‘मैं हूना’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सुष्मिताने हिंदीसह तामिळ आणि बंगाली चित्रपटात देखील काम केले आहे.

दोन मुलींची आई असलेल्या सुष्मिताने आतापर्यंत लग्न केलेले नाही. पण सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असून ती लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. आज तिच्या वाढदिवशी जाणून घ्या तिच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टीः

सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गीय मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे देखील नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता आईने आणि मीना बाजारातील एक टेलर यांनी मिळून शिवले होते. सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्य वाटले होते.

सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली असल्याचे म्हटले जाते. त्या स्पर्धेत सुष्मिताचा सामना ऐश्वर्या रायबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघींनाही एकच प्रश्न विचारण्यात आला होता. जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने उत्तर दिले, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. असे मानले जाते की या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता.

सुष्मिताला कविता खूप आवडतात. ती स्वतःही कविता करते. सुष्मिताने हिंदी माध्यमातून आपले शिक्षण पूर्ण केले आणि तिने वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रजी शिकायला सुरुवात केली होती. सुष्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा सिनेमा फार गाजला होता. या चित्रपटासाठी सुष्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता.