शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. यानंतर सोशल मीडियावर कंगनावर जोरदार टीका झाली. दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. आपण ९ सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असं कंगनानं म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे असं म्हटलं. आता यावरून भाजपा नेत्यानं शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“मुंबई काय शिवसेनेचा कौटुंबीक प्रदेश आहे का? की त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे आणि कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकतं. जे अशाप्रकराची धमकी देतात त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. तुम्ही कोणालाही खरं बोलण्यापासून रोखू शकत नाही,” असं मत हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज यांनी व्यक्त केलं. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आणखी वाचा- “कंगनाला मुंबई आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

आणखी वाचा- “…हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा,” कंगनाच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

राऊतांनीही मांडली भूमिका

“भाजपाच्या काही नेत्यांच्या भूमिकांबद्दलही वाचन केलं. आशिष शेलारही म्हणाले कंगना राणौत यांनी मुंबईला अक्कल शिकवण्याची गरज नाही. त्यांनी हे अधिक जोरात बोललं पाहिजे. महाराष्ट्र हा त्यांचाही आहे. तेदेखील महाराष्ट्रात राजकारण करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणा एकाचे नाही. ते महाराष्ट्राचे संपूर्ण देशाचे आहेत. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रावर एखादी व्यक्ती अशाप्रकारे टीपण्णी करत असेल तर तो विषय एखाद्या पक्षाचा शिवसेनेचा राहत नाही. तो राज्यातील ११ कोटी जनतेचा विषय आहे,” असंही राऊत म्हणाले. बॉलिवूडमधल्या अनेक बड्या कलाकारांनीही तिच्या वक्तव्याचा निषेध केला त्यांचंही मी अभिनंदन करतो असं ते म्हणाले.

आणखी वाचा- “मुंबईला रक्ताचं व्यसन लागलंय”: कंगनाचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

हे आंदोलन केवळ शिवसेनेचं नाही. महाराष्ट्र, मुंबई ही केवळ शिवसेनेची आहे का? ती मराठी माणसाची आहे. महाराष्ट्रात राजकारण करणाऱ्या प्रत्येकाची ती आहे. शुक्रवारी सर्व पक्षीयांनी आंदोलन केलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीदेखील काल तिला सुनावलं. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हेदेखील शुक्रवारी बोलले. जे काही सांगायचं आहे ती सरकारची भूमिका आहे. मीदेखील पक्षाच्यावतीनं जे काही बोलायचं ते बोललो. आता हा विषय संपवायला पाहिजे. जे काही करायचं ते सरकार करेलच असंही ते म्हणाले.