ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी ‘चहावाला, बारवाला’ विषयीचे आक्षेपार्ह ट्विट डिलीट केले आहे. इंडियन युथ काँग्रेसच्या ‘युवा देश’ या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या एका आक्षेपार्ह ट्विटला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘चहावाला’ ट्विटच्या वादात रावल यांचे नाव चर्चेत आले आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्यानंतर रावल यांनी ‘युवा देश’च्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत एक प्रतिक्रिया दिली होती. पण, त्यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनीच नाराजी व्यक्त केली. काँग्रेसवर निशाणा साधत रावल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले होते, ‘आमचा चहावाला तुमच्या बारवाल्याच्या वरचढ आहे.’ हे ट्विट सोशल मीडियावर पोस्ट करताच अनेकांनी रावल यांच्यावर आगपाखड करण्यास सुरुवात केली.
काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विटरवर रावल यांना टॅग करत, ‘काय झाले परेश रावल… त्या ट्विटवर तुम्ही ठाम नाही राहिलात आणि माफीही नाही मागितली.’ त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनीच रावल यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांचा वाढता विरोध पाहता परेश रावल यांनी ते वादग्रस्त ट्विट डिलीट करत सर्वांची जाहीर माफी मागितली.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

‘युवा देश’ या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेल्या त्या मीममध्ये मोदींची खिल्ली उडवण्यात आली होती. हे मीम व्हायरल होत असल्याचे लक्षात येताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राहुल गांधींकडे याविषयीचे स्पष्टीकरण मागितले ज्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी लगेचच उत्तर देत अशा प्रकारच्या विनोदबुद्धीचे आम्ही समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले. हा सर्व वाद वाढत असल्याचे पाहून ‘युवा देश’ या ट्विटर अकाऊंटवरुनही ते मीम डिलीट करण्यात आले आहे.