काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला न्यायालयाने दोषी ठरवले. या हायप्रोफाईल खटल्यात पुनमचंद बिष्णोई यांनी दिलेली साक्ष सलमानला दोषी ठरवण्यास पुरेशी ठरली. पुनमचंद हे लघुशंकेसाठी घराबाहेर गेले आणि सलमान काळवीटाची शिकार करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुनमचंद हे बिष्णोई समाजाचे आहेत.

‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. त्या रात्री नेमके काय झाले, याबाबत बिष्णोईंनी केलेला खुलासा महत्त्वाचा ठरला. मी लघुशंकेसाठी घराबाहेर गेलो. यादरम्यान मला गोळीबाराचा आवाज आला. मला जीपची हेडलाईट दिसली, यादरम्यान मला गोळीबाराचा आवाज आला, असे त्यांनी सांगितले. यानंतर मी शेजारी राहणाऱ्या छोगारामला उठवले आणि आम्ही जीपच्या मागे गेलो, असे त्यांनी म्हटले होते. त्या जीपमध्ये सलमान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसली होती, असे त्यांनी साक्षीत म्हटले होते.

‘बाकीचे कलाकार सलमानला शिकार करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. सलमाननेही लगेचच बंदुकीने गोळी झाडत दोन काळवीटांची शिकार केली’, असा दावा बिष्णोईंनी केला होता. ‘मी व समाजातील अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली असता सलमान व उर्वरित कलाकारांनी घाबरुन काळवीटांना तिथेच सोडून पळ काढला’, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. पुनमचंद बिष्णोईंनी जीपचा नंबर लिहून घेतला आणि वन विभागाला या घटनेची माहिती दिली.

फॉरेन्सिक चाचणीत सलमानच्या जीपमधील रक्ताचे नमुने काळवीटाचे असल्याचे स्पष्ट झाले. हायप्रोफाईल केसमध्ये साक्षीदार साक्ष फिरवतात, असे चित्र नेहमीच दिसून येते. मात्र या खटल्यात पुनमचंद आणि छोगाराम या दोघांनीही शेवटपर्यंत साक्ष फिरवली नाही. त्यांची साक्षच सलमानच्या शिक्षेसाठी पुरेशी होती.  काळवीटांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आणि या दोन साक्षीदारांची साक्ष ही सलमानसाठी अडचणीची ठरली आणि शेवटी त्याला न्यायालयाने दोषी ठरवले. बिष्णोई समाजात काळवीटाला महत्त्व आहे. निसर्गाचे रक्षण करणे हे पहिले कर्तव्य असल्याची या समाजाची विचारधारा आहे.