काळवीट शिकारप्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेल्या सलमान खानला जोधपूर न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जाणार आहे.

जोधपूरजवळील जंगलात १९९८ साली दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ एप्रिल रोजी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. निकालानंतर त्याच्या परदेशवारीवर निर्बंध आले होते. सलमानच्या वतीने मंगळवारी जोधपूर न्यायालयात परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला. न्यायालयाने सलमानला परदेशात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान, ५ एप्रिल रोजी सलमान काळवीट शिकारप्रकरणात दोषी ठरला होता. सलमानला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या ९/५१ या कलमान्वये दोषी ठरवण्यात आले असून या गुन्ह्यासाठी ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतदू आहे. काळवीट हा लुप्तप्राय पाणी असून त्याचा समावेश वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या पहिल्या अधिसूचीत करण्यात आला आहे. सलमानला दोषी ठरवत जोधपूर न्यायालयातील न्या. देवकुमार खत्री यांनी त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर सलमान दोन दिवस जोधपूर तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर असून जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला परदेशवारी करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घ्यावी, अशी अट ठेवली होती.