काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

न्यायमूर्ती खत्री यांनी सलमान खानला दोषी ठरवले. तर उर्वरित आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. अभिनेत्री सोनाली बेंद्रे,नीलम, तब्बू आणि सैफ अली खान या सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते, त्यामुळे संशयाचा फायदा देत न्यायालयाने या सर्वांना दोषमुक्त केले. सलमानच्या शिक्षेबाबत दुपारपर्यंत युक्तिवाद झाला. सलमानच्या शिक्षेबाबतही आज (गुरुवारी) युक्तिवाद झाला. दुपारी न्यायालयाने सलमानला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे  उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.

 

UPDATES:

> सलमान खान दोषी

> न्यायालयात निकाल वाचन सुरु, सलमानसह त्याच्या बहिणी देखील न्यायालयात

> सलमान खान जोधपूर न्यायालयात

> अभिनेता सैफ अली खान न्यायालयात

> अभिनेता सलमान खानही न्यायालयात पोहोचला.

> सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम न्यायालयात पोहोचले.

> जोधपूर न्यायालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त